Saturday, 15 November 2008
पाण्यासाठी वणवण
लोक खवळले; पणजीत अभूतपूर्व पाणीटंचाई
पणजी, दि. १४ (प्रतिनिधी) - गेल्या कित्येक दिवसांपासून पणजी व परिसरात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून त्यामुळे लोक कमालीचे खवळले आहेत. राज्यात पाण्याचा पुरेसा साठा उपलब्ध असूनही लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. आता शक्य तेवढ्या लवकर जर या परिस्थितीत सुधारणा झाली नाही तर लोकांच्या संतापाचा उद्रेक कधीही होऊ शकतो, असे चित्र निर्माण झाले आहे.
लोकांना त्यामुळे विहिरी, टॅंकर अशा साधनांचा आसरा घ्यावा लागत आहे. सांत इनेज, ताळगाव, दोना पावल आदी भागात तर अनेक इमारतींमध्ये वरच्या मजल्यावर पाणी चढणेच कठीण झाले आहे. त्यामुळे अनेकांना अंघोळीलादेखील रजा द्यावी लागली. मुळातच पिण्यासाठी चार घोट पाणी मिळणे मुश्किल झाले आहे. मिळेल तेथून पाणी मिळवण्याच्या प्रयत्नात अनेकांचे कार्यालयीन वेळापत्रकही कोलमडून पडले. वणवण भटकून स्वयंपाकासाठी पाणी मिळाले तर भांडी व कपडे कसे धुवायचे, असा प्रश्न गृहिणींपुढे निर्माण झाला आहे. याबाबत गेल्या काही दिवसांपासून संबंधित सरकारी यंत्रणेकडून कोणताही स्पष्ट खुलासा करण्यात आलेला नाही. त्यामुळे सगळीकडे "लहरी राजा, प्रजा आंधळी अधांतरी दरबार' असे गोंधळाचे चित्र निर्माण झाले आहे. पाणीपुरवठा खात्याने आमचा अंत पाहू नये, अन्यथा आता उग्र आंदोलनाला पर्याय नाही, असा सणसणीत इशारा लोकांनी दिला आहे. पाणीपुरवठ्याच्या बाबतीत सुरू असलेल्या या सावळ्यागोंधळामुळे लोकांतून अत्यंत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
दरम्यान, चौपदरी महामार्गाच्या आड येणारी जलवाहिनी बदलण्याच्या कामामुळे हा पाण्याचा बट्ट्याबोळ निर्माण झाल्याचे सांगण्यात आले. आज (शुक्रवारी) दुपारी १ वाजता ही वाहिनी जोडण्याचे काम पूर्ण झाले असून रात्रीपासून शहरात आणि आसपासच्या भागात पाणीपुरवठा सुरळीत होणार असल्याचे पाणी पुरवठा खात्याचे कार्यकारी अभियंता श्री. श्रीकांत यांनी सांगितले.
जुने गोवे येथे कदंब पठारावर ८५० मीटर लांब ७ एमएमची जलवाहिनी बदलण्यात आली आहे. त्यामुळेच पणजीत पाणीपुरवठा खंडित झाल्याचे ते म्हणाले.
जुने गोवे दुपदरी बगल महामार्गाला जोडूनच ओपा खांडेपार येथून पणजीला येणारी जलवाहिनी टाकण्यात आली आहे. तथापि, आता हा महामार्ग चौपदरी करण्याच्या कामाला सुरुवात होणार असल्याने तेथील जलवाहिनी बाजूला टाकण्याचे काम हाती घेण्यात आले होते. त्यासाठी १२ व १३ नोव्हेंबर रोजी हे काम हाती घेण्यात आले होते. हे काम लांबल्याने कालचा संपूर्ण दिवस पणजीला पाणीपुरवठा झाला नाही. त्यामुळे सांत इनेज, आल्तिनो, बोक द व्हाक, मेरशी, ताळगाव, सांताक्रुझ तसेच शहराच्या आसपास पाण्यामुळे लोकांना वणवण करावी लागली. अचानक नळाचे पाणी गायबच झाल्याने सकाळी उठल्यावर अनेकांना सार्वजनिक शौचालय गाठावे लागले.
पणजी शहराला एका दिवसासाठी १५ एमएलडी पाणी लागते. काही ठिकाणी पाण्याचे टॅंकर पाठवून दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. तथापि, टॅंकरची संख्या कमी असल्याने अनेकांना पाणी उपलब्ध झाले नाही. आज दुपारी जलवाहिनी जोडण्याचे काम पूर्ण झाल्याने दुपारपासून पाणी टाकीत पडण्यास सुरुवात झाल्याचे श्री. श्रीकांत यांनी सांगितले. त्यामुळे उद्या सकाळपर्यंत सुरळीतपणे पाणीपुरवठा होणार असल्याचा दावाही त्यांनी केला.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment