Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 12 November 2008

गोवा शिपयार्डचा गौरव

"सर्वोत्कृष्ट शिपयार्ड' पुरस्कार दिल्लीत प्रदान
पणजी, दि. ११ - गोवा शिपयार्ड लिमिटेडला २००६-०७ वर्षासाठी प्रतिष्ठेचा "सर्वोत्कृष्ट शिपयार्ड' हा पुरस्कार प्राप्त झाला असून ७ नोव्हेंबर रोजी नवी दिल्लीतील "डीआरडीओ' भवनात शानदार सोहळ्यात संरक्षणमंत्री ए. के.अँटनी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
२००५ -०६ सालापासून हा पुरस्कार देण्यात येत असून पहिल्या वर्षीही तो गोवा शिपयार्डलाच मिळाला होता. सलग दोन वर्षे हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्राप्त करणारे गोवा शिपयार्ड हे देशातील पहिलेच शिपयार्ड होय.
या पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी संरक्षणमंत्री अँटनी होते. तसेच संरक्षण उत्पादन सचिव प्रदीप कुमार, संरक्षण मंत्रालय, लष्कर व विविध संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. गोवा शिपयार्डने झपाट्याने केलेली प्रगती, उत्पादकता वाढवून ग्राहकांना पूर्ण समाधानी केल्याबद्दल, कामगारांचा जास्तीत जास्त सहभाग, योग्य गतीने संशोधन व विकास, खर्चात कपात, मनुष्यबळ विकासाला प्राधान्य व दर्जात्मक दृष्टिकोन यासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे.
गोवा शिपयार्डचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रिअर ऍडमिरल ए. के. हंडा (एव्हीएसएम, व्हीएसएम) यांनी सलग दुसऱ्या वर्षीही हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. हा पुरस्कार म्हणजे शिपयार्डच्या कार्यातील मैलाचा दगड ठरला असून त्याचे सारे श्रेय ठरवलेल्या किमतीत व आंतरराष्ट्रीय दर्जाची जहाजे निर्माण करण्यासाठी झटणाऱ्या शिपयार्डच्या सर्व मंडळींना द्यावे लागेल, असे श्री. हंडा यांनी म्हटले आहे.

No comments: