Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 15 November 2008

नेव्ही हाऊस परिसरात आग

कसलीही हानी नाही
वास्को, दि.१४ (प्रतिनिधी) - आज बालदिनानिमित्ताने नौदलातर्फे आयोजित कार्यक्रमात आतषबाजीत एक ठिणगी गवताळ भागात पडल्याने तेथे मोठी आग भडकली. त्यामुळे नेव्ही हाऊसभोवतीच्या गवताने पेट घेतल्याने चार अग्निशामक बंबांना घटनास्थळी बोलावून नौदलाच्या कर्मचाऱ्यांनी आग विझवली.
काही क्षणांत आग वेगाने अन्यत्र फैलावली. त्यामुळे तेथे उपस्थित नौदल अधिकाऱ्यांनी पाण्याने भरलेल्या बादल्या ओतून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यामुळे आगीला थोपवता न आल्याने नौदलाच्या दोन व गोवा अग्निशामक दलाच्या दोन बंबांना घटनास्थळी बोलाविण्यात आले. त्यानंतर सुमारे ४५ मिनिटांच्या अथक प्रयत्नाने आग आटोक्यात आली. यावेळी तेथे सुमारे पाचशे लोकांचा जमाव होता. त्यात सुमारे २४० बालके होती. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
आग आटोक्यात आल्यानंतर पुन्हा अर्धवट राहिलेला बालदिन कार्यक्रम पुढे सुरू करण्यात आला.
यावेळी बोलताना गोवा नौदलीय विभागाचे ध्वजाधिकारी संजय वडगावकर यांनी सांगितले की, बालकेही देशाची संपत्ती असून त्यांना चांगली शिकवण देणे आवश्यक आहे.
नेव्ही हाऊसमध्ये बालदिनानिमित्त विविध शाळांच्या विद्यार्थ्यांचे खास कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी ध्वजाधिकारी वडगावकर, श्रीमती विजयादेवी राणे, नौदलाचे इतर अधिकारी, उपस्थित होते.
याप्रसंगी थरारक हवाई कसरती, वाद्यपथकातर्फे खास कार्यक्रम, जादूचे प्रयोग असे विविध कार्यक्रम आयोजित केले होते. नौदलाच्या विद्यार्थ्यांनीही संगीतमय कार्यक्रम सादर केला. ध्वजाधिकारी वडगावकर यांनी उपस्थित बालकांना खाऊची पाकिटे वाटली.

No comments: