वाळपई पोलिस स्थानकात "एसीबी'ची कारवाई
पणजी, दि. १३ (प्रतिनिधी) - वाळपई पोलिस स्थानकात भ्रष्टाचारविरोधी पथकाने ("एसीबी') सापळा रचून उपनिरीक्षक विलेश दुर्भाटकर व हवालदार श्याम गावस यांना दोन हजार रुपयांची लाच घेताना मुद्देमालासह ताब्यात घेतले. या धडक कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे.
आज दुपारी ३.३० वाजता ही कारवाई करण्यात आली.
या पोलिस अधिकाऱ्यांविरोधात आकाश कदम या तरुणाने आज सकाळी भ्रष्टाचारविरोधी पथकाकडे तक्रार दाखल केली होती. उद्या (शुक्रवारी) सकाळी या घटनेचा संपूर्ण अहवाल पोलिस महासंचालक बिजेंदर ब्रार यांच्याकडे सोपवला जाणार असून दुपारपर्यंत या दोन्ही पोलिस बडतर्फ केले जाण्याची शक्यता एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात तक्रारदार कदम व पोलिस उपनिरीक्षक दुर्भाटकर यांच्यात या दोन हजारांसाठी वाटाघाटी सुरू होत्या, अशी माहिती भ्रष्टाचारविरोधी पथकाचे निरीक्षक राजेश कुमार यांनी दिली. अमलीपदार्थ विरोधी पथकाची महिला उपनिरीक्षक संध्या गुप्ता हिच्यानंतर दुर्भाटकर हा अशा प्रकराची कारवाई होणारा दुसरा उपनिरीक्षक ठरला आहे.
प्राप्त माहितीनुसार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात तक्रारदार आकाश कदम हा आपल्या मैत्रिणीसोबत एका वाहनात वाळपई या भागात गेला होता. हे दोघे एका ठिकाणी आपले वाहन उभे करून थांबले असता तेथे गस्तीवरील उपनिरीक्षक दुर्भाटकर व हवालदार गावस यांनी त्यांना हटकले. यावेळी त्यांनी कदम याच्याकडून त्याचा वाहन परवाना, पॅन कार्ड व त्या युवतीचे ओळखपत्र घेतले. त्यानंतर, घरी जायचे असल्यास दोन हजार रुपये द्या आणि तुमची कागदपत्रे घेऊन जा, अशी अट त्यांना घालण्यात आली. दोन दिवसांत पैसे देतो असे सांगून कदम यांनी तेव्हा आपली तात्पुरती सुटका करून घेतली. मात्र त्यानंतर दोन हजार रुपयांसाठी तक्रारदाराला सतत फोन येत होते, अशी माहिती निरीक्षक कुमार यांनी दिली. अखेर तक्रारदाराने याची माहिती भ्रष्टाचार विरोधी पथकाला दिल्यानंतर हा सापळा रचण्यात आला.
त्यानुसार आज दुपारी ३.३० वाजता वाळपई पोलिस स्थानकावर दोन हजार रुपये देण्याचे ठरवण्यात आले. सापळ्याच्या आराखड्यानुसार पोलिसांना देण्यात येणारे त्या दोन हजार रुपयांच्या नोटांवर खास खूण करण्यात आली होती. ते पैसे कदम यांनी उपनिरीक्षक दुर्भाटकर याच्या हातात दिले असता त्याचवेळी भ्रष्टाचार विरोधी पथकाने त्याला पौशांसह ताब्यात घेतले. याप्रकरणी उपनिरीक्षक दुर्भाटकर व पोलिस हवालदार गावस यांची जबानी नोंदवून घेण्यात आली आहे. पोलिस खात्यात शिपाई म्हणून भरती झालेला विलेश दुर्भाटकर हा हल्लीच भरती झालेल्या उपनिरीक्षक तुकडीतील अधिकारी आहे. दोन महिन्यांपूर्वीच त्याला वाळपई पोलिस स्थानकावर रुजू करण्यात आले होते, अशी माहिती मिळाली आहे.
Friday, 14 November 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment