विविध तर्कवितर्कांना उधाण
पणजी, दि. ९ (प्रतिनिधी) - आपल्या अल्पवयीन मुलीवर मंत्र्याच्या पुत्राने बलात्कार केल्याचा आणि अश्लील एसएमएस पाठवत असल्याचा आरोप करून दोन मंत्र्यांना आणि त्यांच्या नातेवाइकांना कात्रीत पकडलेल्या त्या जर्मन महिलेने आपली तक्रार मागे घेण्यासाठी उत्तर गोवा पोलिस अधीक्षक तसेच कळंगुट पोलिस स्थानकात एक पत्र पाठवल्याने खळबळ माजली आहे. "पोलिस व्यवस्थेवरून माझा विश्वास उडालेला आहे, मला न्याय मिळू शकणार नाही. त्यामुळे रोहित याच्यावरील गुन्हे मागे घेण्यात यावे' असे तिने तक्रार मागे घेण्यासाठी केलेल्या पत्रात म्हटले आहे, अशी माहिती सूत्रांकडून उपलब्ध झाली आहे. याविषयी पोलिस अधीक्षक बॉस्को जॉर्ज यांना विचारले असता, "आपण रजेवर असून आपल्याला अशा प्रकरणाचे एक पत्र आल्याची कार्यालयातून माहिती मिळाली आहे. परंतु, त्या पत्रात नेमके काय म्हटले आहे, हे अद्याप उघड करणे योग्य होणार नाही' असे ते म्हणाले. या पत्रामुळे आता या प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वीच या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन "सुमोटो' याचिका दाखल करून घेतली आहे. त्याचप्रमाणे या प्रकरणात संशयिताला अटकही झालेली असून उद्या त्याला बाल न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर पिडीत मुलीच्या आईने तक्रार मागे घेण्याची प्रक्रिया सुरू केल्यास तिच्यावर कायदेशीर कारवाई होण्याचीही शक्यता आहे, असे कायदे तज्ज्ञाचे मत आहे. या प्रकरणात राजकीय नेत्यांचे सुपुत्र व नातेवाईक गुंतल्याचे आणि मंत्रीच सहआरोपी असल्याने गेल्या काही दिवसापूर्वी या महिलेवर प्रचंड राजकीय दबाव येत असल्याचे तिचे वकील आयरिश रॉड्रिगीस यांनी जाहीर केले होते. त्याचप्रमाणे यापूर्वी खुद्द शिक्षणमंत्र्याची पत्नी व मुख्य संशयित रोहित मोन्सेरात याची आई जेनिफर मोन्सेरात हिने तिच्या घरी जाऊन तिला धमकावल्याची तक्रार यापूर्वी पोलिस स्थानकात दाखल करण्यात आली आहे.
परंतु, अद्याप त्या तक्रारीवर कोणतीही कारवाई झालेली नाही.
दि. २ ऑक्टोबर रोजी पहिल्यांदा या महिलेने कळंगुट पोलिस स्थानकावर तक्रार दाखल केली होती. त्यानंतर दि. १४ ऑक्टोबर रोजी ती महिला आणि तिचे वकील रोड्रिगीस पोलिस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दाखल करण्यासाठी जाणार होते. त्याच्या आदल्या रात्री दि. १३ ऑक्टो. रोजी ऍड. रोड्रिगीस यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. त्याही परिस्थितीत दि. १४ रोजी इस्पितळात त्या महिलेसह सदर पोलिस तक्रार नोंदविण्यात आली होती.
दरम्यान, आज घडलेल्या या घडामोडीत त्या जर्मन महिलेने पोलिस अधीक्षकांना लिहिलेल्या त्या पत्रात नेमके काय म्हटले आहे, कोणत्या कारणासाठी ती गंभीर स्वरूपाची तक्रार मागे घेण्यासाठी तिच्यावर कोणी दबाव टाकला आहे का, हे प्रश्न सध्या सर्वांना सतावत आहे. येत्या काही दिवसांत या पत्रामागचे रहस्य स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
Monday, 10 November 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment