डॉ. प्रमोद सावंत यांच्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ
पाळी, दि.११ (वार्ताहर) - कॉंग्रेस सरकारने सामान्यांना जगणे असहाय्य करून ठेवले आहे. महागाईचा भस्मासुर येथील जनतेला कवेत घेऊन बसला आहे. अत्याचार, बलात्कार, खून, दरोडे तर रोजच होताहेत. हे कमी म्हणून आता हिंदूंची मंदिरे उद्ध्वस्त करण्याचा सपाटा चालू आहे. हल्लेखोरांना पकडण्याची सरकारदरबारी योग्य ती कारवाई होत नाही. त्यामुळे सर्वत्र बजबजपुरी माजली आहे. हे थांबवण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे सरकार येण्याची गरज आहे. त्यासाठी येत्या २६ तारीखला आपली मते भाजपला देऊन डॉ. प्रमोद सावंत यांना भरघोस मतांनी निवडून आणा, अशी हाक भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार श्रीपाद नाईक यांनी दिली. भाजपचे अधिकृत उमेदवार डॉ. प्रमोद सावंत यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटनप्रसंगी नाईक बोलत होते.
यावेळी त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर, डॉ. प्रमोद सावंत, दयानंद सोपटे, प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर, दयानंद मांद्रेकर, फ्रान्सिस डिसोझा, महादेव नाईक, राजेश पाटणेकर, दामू नाईक, अनंत शेट, दिलीप परुळेकर, जिल्हा पंचायत सदस्य शुभदा सावईकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना पर्रीकर म्हणाले, कॉंग्रेस सरकारमधील मंत्री, आमदारांत एकवाक्यता नाही. कोणीही कोणावरही विश्वास ठेवायला तयार नाही. एकेक मंत्री दुसऱ्या मंत्र्याच्या भानगडी उकरून काढून त्याला अपात्र करण्यासाठी सभापतींकडे लेखी तक्रारी करीत आहे. याचाच अर्थ सरकारात सावळागोंधळ आहे. त्यामुळे सामान्यांच्या नशिबी समस्यांविना काहीही नाही.
भाजप कार्यकर्ते संघटित झाले असून पक्षाच्या विजयासाठी ते कंबर कसून कार्यरत आहेत. त्यामुळे आपला विजय निश्चित आहे, असा दावा भाजपचे उमेदवार डॉ. प्रमोद सावंत यांनी केला. यावेळी सौ. सावईकर यांनीही आपले विचार मांडले. सुभाष मळीक यांनी स्वागत केले.यशवंत माडकर यांनी आभार मानले.अनिल परब यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी प्रचंड संख्येने भाजपसमर्थक व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
Wednesday, 12 November 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment