Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday, 6 April 2010

मासोर्डे, वाळपईवर खाणीचे मोठे संकट

खाणीसाठी एका मंत्र्याचे लॉबिंग
पणजी, दि. ५ (प्रतिनिधी): सत्तरी तालुक्यावरील खाणींचे संकट दिवसेंदिवस गडद होत चालले असून वाळपईपासून अत्यंत जवळच असलेल्या मासोर्डे गावात खाण सुरू करण्यासाठी सिरसाट नामक एका व्यक्तीने एका बलाढ्य मंत्र्याच्या आशीर्वादाने सरकारदरबारी प्रयत्न चालवले आहेत. मासोर्डेतील खाण या गावातून वाहणाऱ्या म्हादई नदीच्या तीरावरच होणार असल्याने या नदीत प्रदूषणाची भर तर पडणारच आहे, पण त्याचबरोबर निसर्गसंपन्न अशा छोट्याशा गावावर भीतीची छाया पसरली आहे. या खाणीमुळे येथील नवोदय विद्यालयाला धोका निर्माण झाला असून विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे या गावाच्या अस्तित्वाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या गावात होणाऱ्या नियोजित खाणीची सीमा वाळपईपर्यंत येऊन टेकली आहे. वाळपई हे सत्तरी तालुक्याचे मुख्य ठिकाण असून वाळपईतून मासोर्डे गावात जाणाऱ्या रस्त्यावरच दर मंगळवारी वाळपईचा आठवडा बाजार भरतो. मासोर्डे गावात वाळपईतून जाण्यासाठी जरी दोन रस्ते असले तरी मंगळवारचा बाजार भरणाऱ्या रस्त्याचा उपयोग खाणीची सामग्री ने आण होण्यासाठी होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. असे झाल्यास या बाजारकर मंडळींवर प्रचंड संकट ओढवणार आहे.
सरकारच्या साधनसुविधा मंडळांतर्फे सध्या वाळपईत करोडो रुपयांची विकासकामे व सुशोभीकरण सुरू आहे. परंतु मासोर्डे गावात खाण झाल्यास या सुशोभीकरणालासुद्धा किंमत उरणार नाही, अशी प्रतिक्रिया येथून मिळत आहे.
दरम्यान, मासोर्डेतील खाणीसाठी जी - ७ गटातील एका मंत्र्याने प्रचंड प्रमाणात सरकारी व स्थानिक पातळीवर लॉबिंग सुरू केले आहे. काही लोकांना आपल्या बाजूने वळवून खाणीसाठी होणारा विरोध मोडून काढण्यासाठी विकासकामे व नोकरीच्या माध्यमातून पद्धतशीर योजना त्या मंत्र्याने तयार केली आहे. मासोर्डेतील नियोजित खाणीमुळे या गावात पर्यावरणदृष्ट्या व धार्मिकदृष्ट्या प्रसिद्ध असलेल्या झऱ्यांवरही संकट कोसळणार आहे.

No comments: