Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 7 April 2010

ड्रग्ज व्यवसायाची व्याप्ती आंतरराष्ट्रीय?

पणजी, दि. ६ (प्रतिनिधी): अमली पदार्थ विरोधी पथकाने नोंद केलेल्या बनावट तक्रारी, पकडलेला अमली पदार्थ गायब होणे आणि ड्रग्ज माफियांना छुप्या मार्गाने संरक्षण पुरवणे हे एका आंतरराष्ट्रीय रॅकेटचा भाग असून त्यांची "इंटरपोल'च्या चौकशी करण्याची मागणी होत आहे. सध्या उघड झालेल्या गोष्टी म्हणजे पाण्यावर तरंगणारा हिमनग आहे. याची पाळीमुळे दूरवर गेलेली असून यात मोठ मोठी धेंडे गुंतल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकंदरीत गोवा पोलिस खात्याने अमली पदार्थ विरोधी पथकाकडे पूर्णतः दुर्लक्षच केल्याचे स्पष्ट झाले आहे.
पोलिस उपअधीक्षक पदावरील प्रत्येक अधिकाऱ्यावर पोलिस स्थानकाची तपासणी करून त्याचा अहवाल वरिष्ठ सादर करण्याची जबाबदारी असते. त्याप्रमाणे, पणजी विभागीय पोलिस उपअधीक्षक पदावर असलेल्या अधिकाऱ्यावर अमली पदार्थ विरोधी विभागाची तपासणी करून अहवाल सादर करण्याचे काम सोपवले होते. २००७ साली तत्कालीन उपअधीक्षकांनी मालखान्याची पाहणी न करताच आपला अहवाल सादर केला होता तर २००८ मध्ये तत्कालीन उपअधीक्षकांनी अद्याप अहवाल सादर केलेला नाही. यासाठी त्यांना पोलिस मुख्यालयातून स्मरणपत्रे पाठवली जात असल्याचे मुख्यालयाच्या सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, गुन्हा अन्वेषण विभागाल गुंगारा देणारा पोलिस शिपाई संजय परब याची पांढऱ्या रंगाची ऍक्टिव्हा दुचाकी ताळगाव पठारावर आढळून आली आहे. जीए ०४ डी १९९९ क्रमांकाची ही दुचाकी आगशी पोलिसांना मिळाली असून ती संजय परब याची असल्याची माहिती मिळाली आहे. संजय परब याला ताब्यात घेण्यात गुन्हा अन्वेषण विभागाला अपयश आले असून त्याला मुद्दामहून अटक केली जात नसल्याची माहिती मिळाली आहे. तसेच आपल्याला अटक केल्यास तुमचीही नावे उघड करू, अशी धमकीच संजय याने दिली असल्याने त्याला हात लावायला "सीआयडी' विभाग धजत नसल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, संजय फरार असलेल्या काळात त्याला ज्या व्यक्तीने आसरा दिला त्यालाही आम्ही या प्रकरणात सहआरोपी म्हणून अटक करणार असल्याचे गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस उपअधीक्षक चंद्रकांत साळगावकर यांनी सांगितले. फरारी संशयित आरोपीला लपण्यासाठी आसरा देणे, हाही एक गुन्हा असून तो कुठेही कोणाला दिसल्यास त्याची माहिती दिल्यास आम्ही त्याला अटक करू, असेही श्री. साळगावकर म्हणाले.
-----------------------------------------------------------------
आशिष शिरोडकर व पुनाजी गावस यांनी जप्त केलेले अमली पदार्थ "नकली' असल्याचे स्पष्ट झाल्याने आणि या विषयी दिशाभूल करणारे स्पष्टीकरण वरिष्ठांना देण्यात आल्याने पोलिस गुन्हा दाखल होण्याची शक्यता असल्याचे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
दरम्यान, न्यायालयीन कोठडीत असलेला निलंबित पोलिस निरीक्षक आशिष शिरोडकर याला ताप आल्याने गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

No comments: