हैदराबाद, दि. ३ : टेनिसस्टार सानिया मिर्झा - क्रिकेटपटू शोएब मलिक यांच्या "विवाहपुराणा'चे नवनवे अध्याय रोज रचले जात असताना आता मिर्झा कुटुंबाचे जावईबापू शोएबराव हैदराबादेत दाखल झाले आहेत. काल रात्रीपासून ते आपल्या सासुरवाडीला पोहोचल्याची बातमी वृत्तवाहिन्यांवर झळकत असून पुढे नव्याने काय घडणार याचे तर्क लढवले जात आहेत.
सानियाचे हैदराबादेतले घर...बाल्कनीत सानिया कुणाशी तरी फोनवर बोलतेय...चेहऱ्यावर कमालीचा तणाव...तेवढ्यात सानियाची आई घरातून बाल्कनीत येते...लेकीला समजावते...पण लेक ऐकत नाही...उलट आईवरच चिडते...तेव्हाच मागून एक तरुण येतो...अरे हा तर शोएब मलिक...मग सानिया फोन त्याच्याकडे देते आणि आईशी भांडत-भांडत घरात जाते...
अनेक वृत्तवाहिन्यांवर "एक्स्लुझिव्ह' म्हणून हे दृश्य पाहून आता नव्या चर्चेला उधाण आले आहे, नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. शोएब हैदराबादेत का आला? दुबईहून थेट पाकिस्तानला का गेला नाही? तो आल्यानंतर सानियाच्या घरी तणाव का? सानिया फोनवर कुणाशी बोलत होती? ती एवढी संतप्तका झाली? त्यानंतर त्याच फोनवर शोएब एवढा वेळ काय बोलत होता? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जो-तो आपल्या पद्धतीनुसार शोधतोय.
दरम्यान, शोएब हैदराबादेत आल्याची बातमी येण्याआधी शोएब-सानियाचे लग्न दुबईत होणार असल्याचे वृत्त पाकिस्तानातील जिओ वाहिनीने दिले आहे. हे लग्न हैदराबादेत करण्याचा विचार मिर्झा आणि मलिक कुटुंबीयांनी केला होता. मात्र आता मुलाकडील मंडळींनी विवाहस्थळ म्हणून दुबईची निवड केल्याचे सांगितले जाते. हा निर्णय कळवण्यासाठीच तर शोएब हैदराबादला आला नाही ना, अशीही चर्चा आहे. तथापि, त्यावरून सानिया चिडण्याचे कारण काय? लग्नाची तारीख पुढे ढकलली जातेय की काय, हे कळायला मार्ग नाही. १५ एप्रिलला निकाह होईल, अशी बातमी आहे. बघूया काय होतेय ते.
दुसरीकडे, आएशा सिद्दिकी कुटुंबियांनी आजच शोएब मलिकला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. या प्रकरणाचा निकाल लावण्यासाठी शोएब इथे आला असेल का ?, असाही एक प्रश्न आहे. आता शोएब सानियाच्या घरीच असल्याचं कळल्यावर सिद्दिकी कुटुंबीय तिथेच धडकणार नाहीत ना ? , हेही सांगता येत नाही. थोडक्यात काय तर, जावईबापूंच्या येण्यामुळे काहीतरी राडा होणार, हे नक्की !
Sunday, 4 April 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment