पेडणे, दि. ५ (प्रतिनिधी): दारू पिण्यावरून लावलेली पैज आणि त्यावरून झालेले भांडण यामुळे दांडा गिरकरवाडा हरमल येथील एका हॉटेलमधील बिगरगोमंतकीय वेटरचा त्याच्याच मित्राकडून खून होण्याची घटना उघडकीस आली आहे. पेडणे पोलिसांनी बलवंतसिंह मेहरा (वय ३२, मूळ उत्तरांचल) याचा खून केल्याप्रकरणी मूळ बंगलोर येथील इफ्रान अली (२९) याला अटक केली आहे. काल दि. ४ रोजी रात्रौ १ वा. ही घटना घडली.
पेडणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हरमल येथील बलवंतसिंह मेहरा हा "ऑरेंज स्काय' या रेस्टॉरंटमध्ये कामाला होता व रात्रीच्या वेळी तो "फ्री फ्लो योगा' या योग केंद्रात सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. इफ्रान अली हा वेलकिणी गेस्ट हाउसमध्ये काम करत होता. या दोघांची दाट मैत्री होती, दोघांनी कोण जास्त दारू पितो याची पैज लावली होती. ४ रोजी दोघेही दारू पिण्यासाठी गिरकरवाडा येथील बारमध्ये बसले. यावेळी "फ्री फ्लो योगा'मधील एका कर्मचाऱ्याने बलवंतसिंह आपल्या जाग्यावर नसल्याचे आपल्या मालकाला कळवले. यानंतर मालकाने बलवंतसिंहला फोन केला असता त्याने आपण आपल्या जाग्यावर असल्याचे सांगितले व बारमधून उठून कामाच्या ठिकाणी गेला. यावेळी इफ्रान दारूच्या नशेत फ्री फ्लो योगा सेंटरजवळ आला आणि त्याने बलवंतसिंहशी पैजेच्या विषयावरून वाद घालण्यास सुरुवात केली. बलवंतसिंह दारूच्या अधीन असल्याने त्याचा तोल जात होता. याचाच फायदा घेऊन इफ्रानने बलवंतसिंहवर चाकूने छाती, पाठ व कमरेवर तीन ठिकाणी वार केले.
पेडण्याचे पोलिस निरीक्षक उत्तम राऊत देसाई, उपनिरीक्षक सचिन नार्वेकर, सतीश नाईक, संदीप गावडे, जीतू केरकर आदींनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पोलिस अधीक्षक अरविंद गावस व उपअधीक्षक सॅमी तावारिस यांनी घटनास्थळी भेट देऊन अधिक चौकशी केली व काही जणांच्या महत्त्वाच्या जबान्या घेतल्या.
यावेळी वापरण्यात आलेल्या चाकूचा अर्धा भाग मोडल्याचे आढळून आले असून उर्वरित भाग बलवंतसिंह याच्या छातीत अडकला असल्याची शक्यता पोलिस निरीक्षक उत्तम राऊत देसाई यांनी व्यक्त केली आहे. पहाटे ३.३० वाजता पोलिसांनी इफ्रान आली याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला.
दरम्यान, सकाळी ११ वाजता शववाहिकेने मृतदेह बांबोळी येथे नेण्यात आला. बलवंतसिंह मेहरा याच्या नातेवाइकांना कळवण्यात आले असून पुढील तपास पेडणे पोलिस निरीक्षक उत्तम राऊत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन नार्वेकर करीत आहेत.
Tuesday, 6 April 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment