Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 9 April 2010

पणजीतील आरोपी कोठडीविना "मोकळे'

पणजी, दि. ८ (प्रतिनिधी)- "मॉडर्नायझेशन'च्या नावाखाली पणजी पोलिस स्थानकावरील पोलिस कोठडी बंद ठेवण्याचे आदेश वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिल्याने ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींना स्थानकात "मोकळे' सोडण्याची पाळी पोलिसांवर आली आहे. पणजी पोलिसांची हक्काची अशी पर्यायी कोठडी नसल्याने या संशयितांना दिवसरात्र पोलिस स्थानकातच बसवून ठेवावे लागते. अटक केलेला संशयित आरोपी रात्रीच्या वेळी नजर चुकवून पळाल्यास आपल्या नोकरीवर गदा येईल या भीतीने आता पोलिसांची झोप पार उडाली आहे.
पोलिस स्थानकांचे आणि मुख्यालयाचे आधुनिकीकरण करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून त्यानुसार ही कोठडी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. परंतु, पोलिस स्थानकासाठी वेगळ्या पोलिस कोठडीचा पर्याय ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे गंभीर गुन्ह्यातील संशयित आरोपी असल्यास त्याला पर्वरी, आगशी किंवा जुने गोवे पोलिस स्थानकाच्या कोठडीत ठेवावे लागत आहे. या संशयितांना घेऊन जाण्यासाठी काही काही वेळा पोलिस वाहनही मिळत नसल्याने संशयितांना प्रवासी बसमधून घेऊन जावे लागते.
पोलिस नियमांनुसार ज्या गुन्हेगारांना पकडले जाते त्या गुन्ह्याच्या तपास अधिकाऱ्याच्या समोरच असलेल्या पोलिस कोठडीत गुन्हेगाराला ठेवावे लागते. तसेच, पोलिस कोठडी कशी असावी याबाबतही नियम आहेत. मात्र, कथित "आधुनिकीकरणा'मुळे हे नियम सध्या पाळले जात नसल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.

No comments: