Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 4 April 2010

दहा लाखांचे संगणक वास्कोतून लांबविले

वास्को, दि. ३ (प्रतिनिधी): गस्तीवर असलेल्या वास्को पोलिसांना गुंगारा देऊन शहराच्या मुख्य रस्त्यावर असलेल्या दोन संगणक दुकानांवर डल्ला मारत अज्ञात चोरट्यांनी दहा लाख रुपयांचा माल लंपास केला.
वास्कोतील स्वतंत्रपथ मार्गावरील "पी.सी.स्टेशन' या दुकानातून चोरट्यांनी १७ लॅपटॉप व रोकड, तर एफ.एल.गोम्स मार्गावरील "मॅक्रॉन कंम्प्युर्टस' दुकानातून ४ लॅपटॉप व रोकड घेऊन येथून पोबारा केला. शहरात वाढत असलेल्या चोऱ्यांमुळे जनता हैराण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, मुख्य रस्त्यावरील दोन संगणक दुकानांत चोरी झाल्याचे वृत्त पसरताच खळबळ माजली असून पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल प्रश्न चिन्हनिर्माण झाले आहे. वास्को चोरी झाल्याची माहिती पोलिसांना आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मिळाली. नंतर त्यांनी त्वरित सदर प्रकरणाच्या चौकशीस सुरुवात केली. "सपना टेरेस' या इमारतीतील "पी.सी.स्टेशन' हे दुकान काल रात्री ८.३० वाजता बंद करण्यात आल्यानंतर आज सकाळी ९.३० च्या सुमारास ते उघडण्यासाठी ह्या दुकानाचा कर्मचारी शिवदास वासू रेडकर येथे पोचला. दुकानाचे शटर वाकवण्यात आल्याचे यावेळी लक्षात आल्याने त्याने त्वरित याबाबत वास्को पोलिसांना माहिती दिली.
तसेच "मॅक्रॉन कंम्प्युर्टस' दुकानाचे मालक वीरेश सुनकेरीकर यांना त्यांच्या दुकानाचे टाळे तोडून चोरी झाल्याचे कळताच त्यांनीही सकाळी नऊच्या सुमारास पोलिसांना त्याबाबत माहिती दिली.
पोलिसांनी दोन्ही ठिकाणी श्वानपथक तसेच ठसेतज्ज्ञांना पाचारण करून पंचनामा केला.
चोरट्यांनी "पी.सी.स्टेशन' दुकानातून सहा हजार सातशे रुपयांची रोख रक्कम व १७ लॅपटॉप मिळून आठ लाखांचा माल तर
"मॅक्रॉन' नामक दुकानातून ३० हजाराची रोकड व चार संगणक मिळून येथून १ लाख ५१ हजाराची मालमत्ता लांबवली.
यासंदर्भात सदर प्रतिनिधीने उपअधीक्षक महेश गावकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यातील चोरट्यांची संख्या सात ते आठ असावी, असा अंदाज व्यक्त केला. त्यांना लवकरच गजाआड केले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
वास्कोच्या एका हॉटेलात चोरट्यांनी वास्तव्य केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यादृष्टीने तपास सुरू असल्याचे गावकर यांनी सांगितले. याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. निरीक्षक ब्राझ मिनेझीस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक वैभव नाईक पुढील तपास करीत आहेत.

No comments: