एकाची ओळख पटल्याचा एटीएसचा दावा
मुंबई, दि. ८ - पुण्यातील जर्मन बेकरीत झालेल्या भीषण बॉम्बस्फोटाच्या कटाचे धागेदोरे उलगडण्यात एटीएसला यश आले असून या स्फोटामागे इंडियन मुजाहिदीन या अतिरेकी संघटनेचा हात असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
या संघटनेचा संस्थापक रियाझ भटकळ याचा भाऊ यासीन पुणे कटाचा मुख्य सूत्रधार असल्याचा दावाही एटीएसने केला आहे. यासीन भटकळसह कटाच्या चार संशयित सूत्रधारांची ओळख पटली असून या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक केली जाईल, अशी माहिती आहे.
दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) या कटाचा सविस्तर तपास करून आपला चौकशी अहवाल नुकताच केंद्र सरकारला सादर केला. या अहवालात चौघा संशयित सूत्रधारांची ओळख पटल्याचे नमूद करण्यात आले आहे. पुणे स्फोटाच्या कटाच्या सूत्रधारांमध्ये यासीन भटकळचा समावेश आहे. यासीन हा इंडियन मुजाहिदीनचा संस्थापक रियाझ भटकळचा भाऊ आहे. २००६ साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटांचा कट रियाझने आखला होता. तेव्हापासून तो फरार आहे. कर्नाटकमधील भटकळ गावचे ते मूळ रहिवासी आहेत.
पुण्यातील कोरेगाव पार्क या परिसरातील जर्मन बेकरीत गेल्या १३ फेब्रुवारी रोजी झालेल्या बॉम्बस्फोटात १७ जण ठार झाले होते. तेव्हापासूनच संशयाची सुई इंडियन मुजाहिदीन या संघटनेकडेच होती.
Friday, 9 April 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment