Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 5 April 2010

सत्तरीवरील खाणींचे महासंकट राजकारण्यांमुळे अधिक गडद

गावे वाचविण्याचे राजेंद्र केरकर यांचे आवाहन

वाळपई, दि. ४ (प्रतिनिधी) - सत्तरी तालुक्यावर सध्या खाणींचे प्रचंड प्रमाणात संकट आले असून सत्तरीतील अभयारण्याचे क्षेत्र वगळल्यास अन्य सर्व गावांवर खाणींचे भीषण महासंकट येऊन ठाकले आहे. सत्तरीतील पोर्तुगीज कालीन खाणी पुनरुज्जीवित करून व त्यात भरीस भर म्हणून नवीन खाणी सुरू करण्याचे कटकारस्थान सध्या राजकीय पातळीवर शिजत असून, त्यात मंत्रीही सहभागी आहेत. सोनाळ, सावर्डे, कुमठळ, करंजोळ, पिसुर्ले, पर्ये, होंडा व नगरगाव आदी गावांवर या"मिनेरां'ची वक्रदृष्टी पडली आहे. आपले गाव वाचविण्यासाठी प्रबळ राजकीय नेतृत्वाची गरज निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन पर्यावरणप्रेमी प्रा.राजेंद्र केरकर यांनी सोनाळ सत्तरी येथे आयोजित केलेल्या साहित्य सहल कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.
यावेळी ऍड. भालचंद्र मयेकर, सदानंद काणेकर, शिवाजी देसाई, रणजीत राणे, विजय नाईक, विठ्ठल पारवडकर, नरेंद्र पांडव, माधव सटवाणी, दामोदर मळीक, सौ. पौर्णिमा केरकर, म्हाळु गावस, संदीप केळकर, मोहन कुलकर्णी आदी मान्यवर कवी उपस्थित होते. राजेंद्र केरकर पुढे म्हणाले की, साहित्यिकांनी पर्यावरणावर आधारीत कथा, कादंबरी, कविता इत्यादींचे लेखन करावे. जेणेकरून एकप्रकारे खाण विरोधी आंदोलनाला बळकटी येईल. सोनाळ, मोर्ले, होंडा, पर्ये, नगरगाव या ठिकाणी खाणींचे संकट उभे आहे. तेव्हा सत्तरीत जनतेने व साहित्यिकांनी या गोष्टींचा विचार करावा. धावे गावावरही खाणींचे संकट आहे. सरकार एका बाजूला पश्चिम घाट वाचविण्यासाठी मोहीम आखत आहे तर बाजूला खाणी सुरू करीत आहे. त्याचबरोबर बफर झोनची मर्यादा शून्य करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या असून याचा फटका सत्तरी तालुक्याला बसणार आहे. म्हादई अभयारण्याच्या क्षेत्रात वाघ सापडल्याचे पुरावे वन खात्याच्या अधिकाऱ्यांना मिळाले आहेत व अशा व्याघ्र क्षेत्रात कोणीही खाण सुरू करू शकत नाही,असे शेवटी केरकर यांनी स्पष्ट केले. यावेळी सायंकाळी सोनाळ येथील मारुती मंदिरात कवी संमेलन झाले व सायंकाळी सांगता झाली. सूत्रनिवेदन ऍड. शिवाजी देसाई यांनी केले तर आभार विजय नाईक यांनी मानले.

No comments: