पणजी, दि. ७ (प्रतिनिधी): सावर्डे सत्तरीमधील नियोजित खाणीमुळे सत्तरी तालुक्याच्या अस्तित्वावर संकट आले असून म्हादई नदी व जवळपास ५७ गावांना पाणी पुरवठा करणारा दाबोस पाणी प्रकल्प धोक्यात आला आहे. सावर्डे येथे होणारी सदर नियोजित खाण ही हरीत पट्ट्यात येत असल्याने ती पूर्णपणे बेकायदा असल्याची माहिती सावर्डे (सत्तरी) खाण विरोधी नागरिक कृती समितीचे अध्यक्ष रघू सखाराम गावकर यांनी दिली.
सत्तरी तालुक्यातील खाणींचे संकट गडद झाले असून सावर्डे सत्तरी येथे होणाऱ्या नियोजित खाणीच्या विरोधात राजकीय दबाव झुगारून नागरिकांनी उठाव केला आहे. सावर्डे (सत्तरी) खाण विरोधी नागरिक कृती समितीची बैठक सावर्डे येथे झाली. या प्रसंगी व्यासपीठावर समितीचे उपाध्यक्ष लवू राम गावकर, सचिव आत्मा न. गावकर, अमृतराव देसाई, निमंत्रक बोंबी सावंत, नारायण नाईक, रघुनाथ गावकर आदी मान्यवर उपस्थित होते.
सावर्ड्यातील नियोजित खाणीमुळे सावर्डे सरकारी प्राथमिक व माध्यमिक शाळेचे अस्तित्व आणि पर्यायाने येथील विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. शाळेच्या मुलांना खेळण्यासाठी असलेले मैदान खाणीमुळे नष्ट होणार असून त्यांचे एकूण जीवन अंधकारमय होण्याची भीती श्री. गावकर यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी बोलताना अमृतराव देसाई यांनी नियोजित खाणीमुळे शेतकऱ्यांवर प्रचंड मोठे संकट येणार असल्याचे सांगितले. येथील बागायती, काजू पिके पूर्णपणे नष्ट होणार असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
नारायण नाईक यांनी सावर्ड्यातील खाणीचे दुष्परिणाम केवळ स्थानिक जलस्रोतांवरच नव्हे शेजारच्या गावातही प्रदूषण होण्याची भीती व्यक्त केली. आंदोलनाच्या प्रत्येक टप्प्यावर पर्यावरणप्रेमींना पाचारण करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. तसेच एकजुटीने खाण प्रकल्पांना विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला.
Thursday, 8 April 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment