Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 9 April 2010

महामार्ग ४(अ)च्या रुंदीकरणात भ्रष्टाचार

... तर आंदोलन छेडण्याचा पर्रीकरांचे इशारा

पणजी, दि. ८ (प्रतिनिधी)- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ (अ) अंतर्गत मोले ते पणजी महामार्गाच्या चौपदरीकरणात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व साटेलोटे असल्याचा संशय आहे. खाण उद्योजकांवर मेहरनजर करण्याच्या उद्देशानेच या महामार्गाची आखणी करण्यात येत असून सामान्य लोकांची घरे उद्ध्वस्त करून बड्या लोकांना आश्रय देण्याचे कारस्थानही सुरू आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने लोकांना अंधारात ठेवून या महामार्गाचे काम पुढे रेटल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी दिला.
आज इथे बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत श्री. पर्रीकर बोलत होते. यावेळी भाजप नेते सुनील देसाई उपस्थित होते. गोव्यातील लोकांना रस्ता रुंदीकरणाची गरज आहे पण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आपल्या मनाप्रमाणे आखलेल्या महामार्गाची राज्याला गरज नाही, असे मतही श्री. पर्रीकर यांनी व्यक्त केले. मुळातच या रस्त्याची आखणी प्रत्यक्ष स्थितीची पाहणी न करताच करण्यात आली आहे. खोर्ली ते फोंडापर्यंत हजारभर बांधकामे पाडावी लागतील. त्यात साफा मशीद, चिंबल चर्चचा काही भाग, फोंडा येथील भाऊसाहेब बांदोडकर यांचा पुतळा आदींचाही समावेश आहे, असेही ते म्हणाले. या रस्त्याच्या विषयावर खुली चर्चा होण्याची गरज आहे, असे सांगून काही नेते या विषयाचे भांडवल करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप त्यांनी केला. अलीकडेच कॉंग्रेसच्या नेत्यांनी महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली पण या बैठकीत सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना मात्र टाळण्यात आले. सा.बां. मंत्री चर्चिल आलेमाव यांनी उद्या ९ रोजी सकाळी पर्वरी येथे यासंदर्भात बैठक बोलावली आहे व तिथे या महामार्गाबाबत चर्चा होईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
विविध गावे व शहरांतून या महामार्गाची आखणी करण्यात आली आहे. या संपूर्ण आखणीचा फेरविचार करून प्रत्येक गोष्टीचा सखोल अभ्यास करूनच हा प्रकल्प राबवावा लागेल, असेही ते म्हणाले. महामार्ग प्राधिकरणाकडून निमलष्करी दलाचा वापर करून घरे, बांधकामे खाली करण्यात येईल, अशी भीती लोकांना दाखवण्यात येते पण तसा प्रयत्न झाल्यास भाजप गप्प बसणार नाही, असा सज्जड इशाराही श्री. पर्रीकर यांनी यावेळी दिला.
कमलनाथ यांना पत्रः मुख्यमंत्री
मोले ते पणजी या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाची मर्यादा ६० मीटरवरून ४५ मीटर करावी, अशी विनंती केंद्रीय महामार्गमंत्री कमलनाथ यांना केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी दिली. ही रुंदी कमी झाल्यानंतर आपोआपच ही समस्या दूर होईल. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे पथक या महिन्याच्या अखेरीस गोव्यात येईल व त्यावेळी ते या भागातील प्रत्यक्ष परिस्थितीचा अभ्यास करतील. या भेटीवेळी हे सगळे विषय त्यांच्यासमोर मांडण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री कामत म्हणाले.

No comments: