पणजी, दि. ८ (प्रतिनिधी)- पणजी पोलिस स्थानकावर दगडफेक करून "रणकंदन' माजवलेल्या प्रकरणाची सत्र न्यायालयात सुनावणी सुरू झाली असून आज या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी तथा राज्याचे शिक्षण मंत्री बाबूश मोन्सेरात, त्यांची पत्नी जेनिफर मोन्सेरात, महापौर कॅरोलिना पो, माजी महापौर टोनी रॉड्रिगीस, नगरसेवक उदय मडकईकर, कृष्णा शिरोडकर ऊर्फ मिलिंद व अन्य तीस संशयित आरोपी न्यायालयात उपस्थित होते. मात्र न्यायाधीशच रजेवर असल्याने याविषयीची पुढील सुनावणी येत्या २४ जून २०१० रोजी ठेवण्यात आली आहे.
१९ फेब्रुवारी २००८ रोजी ताळगाव मतदारसंघाचे आमदार बाबूश मोन्सेरात व त्यांची पत्नी जेनिफर मोन्सेरात यांनी पणजी पोलिस स्थानकाचे तत्कालीन निरीक्षक सुदेश नाईक यांना निलंबित करण्याची मागणी करत मोर्चा काढला होता. या मोर्चात सुमारे ५०० लोकांनी भाग घेतला होता. बाबूश मोन्सेरात यांनी भाषण केल्यानंतर खवळलेल्या जमावाने पोलिस स्थानकावर दगडफेक करून अनेक पोलिसांना जखमी केले होते. तसेच बाहेर उभी करून ठेवलेल्या एका दुचाकीलाही आग लावण्यात आली. यात सरकारी मालमत्तेचे सुमारे ३ लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे. केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाने दि. २९ नोव्हेंबर २००९ मध्ये या सर्वांवर आरोपपत्र दाखल केले होते. तर, राज्यातर्फे पणजी पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक तुषार लोटलीकर हे या प्रकरणाचे तक्रारदार आहेत.
वरील सर्व संशयितांवर भा.दं.सं. १४३, १४७, १४८, १४९, १५३, ३२४, ३२५, ३२६, ३३२, ३३३, ४२७ व ४३५ कलमानुसार आरोप ठेवण्यात आले आहेत. आजपासून या विषयीची सुनावणी सत्र न्यायालयात सुरू होणार होती. परंतु, न्यायाधीश रजेवर गेलेले असल्याने या विषयीची सुनावणी पुढे ढकलण्यात आली.
Friday, 9 April 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment