Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 10 April 2010

क्रीडा खात्याच्या 'डे-नाइट' मुलाखती

पणजी, दि. ९ (प्रतिनिधी): राज्य क्रीडा खात्यातर्फे विविध पदांसाठी मुलाखती घेण्याच्या निमित्ताने एक नवी पद्धत सुरू करण्यात आली आहे. खात्यातर्फे सध्या "डे-नाइट' मुलाखती सुरू असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. उमेदवारांना सकाळी मुलाखतीसाठी बोलावून प्रत्यक्ष मुलाखतींना मात्र संध्याकाळी उशिरा सुरुवात करून रात्री उशिरापर्यंत मुलाखतीच्या नावाने बेरोजगार युवा-युवतींची जाहीर चेष्टा करण्याचा संतापजनक प्रकार सुरू आहे.
क्रीडा खात्याअंतर्गत शारीरिक शिक्षण प्रशिक्षक, लष्कर व इतर चतुर्थश्रेणी पदांसाठी सध्या मुलाखती घेण्याचे काम सुरू आहे. या पदांसाठी शेकडो बेकार युवा-युवतींनी अर्ज केले असून प्रत्येक दिवशी मुलाखतींसाठी या उमेदवारांच्या रांगा खात्यात लागलेल्या असतात. सरकारने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार या मुलाखती सकाळी १० वाजता सुरू होतात. खात्याच्या संचालक डॉ. सुझान डिसोझा या मात्र बिनधास्त दुपारी व किंवा संध्याकाळी कामावर येतात व त्यानंतरच रात्री उशिरापर्यंत मुलाखतीच्या नावाने या उमेदवारांची थट्टाच सुरू असते, अशीही खबर मिळाली आहे. या उमेदवारांना चहा, सामोसे वगैरे दिले जातात. त्यांनी केलेली प्रतीक्षा हा त्यांच्या मुलाखतीचाच एक भाग असल्याचेही निमित्त पुढे करून या कृतीचे समर्थन केले जाते.
प्राप्त माहितीनुसार खात्याच्या संचालक डॉ. सुझान डिसोझा यांच्या अरेरावी वृत्तीला काहीही पारावार राहिलेला नाही. त्यांनी आपल्या मर्जीप्रमाणेच खात्याचा कारभार हाकण्यास सुरुवात केली असून सर्व प्रशासकीय नियम ढाब्यावर बसवून या खात्यात क्रीडा संचालकांनी रडीचा डाव मांडला आहे, असाही आरोप होऊ लागला आहे.
मुलाखतीच्या पहिल्या दिवशी क्रीडा संचालक दुपारी ३ वाजता पोचल्या व त्यानंतर मुलाखती सुरू झाल्या. भल्या पहाटे घरातून उपाशी पोटी बाहेर पडलेल्या उमेदवारांना ताटकळत ठेवून एकार्थाने त्यांची थट्टाच सुरू असल्याची टीका होत आहे. संचालकांच्या या भूमिकेमुळे अनेक उमेदवारांनी या प्रकाराला कंटाळून घरची वाट धरणेच पसंत केले आहे. नोकरीची गरज आहे हे जरी खरे असले तरी त्यासाठी अशा पद्धतीने लाचारी पत्करण्यास लावण्याची या सरकारची रीत अजिबात पसंत नाही, अशी प्रतिक्रिया यावेळी एका उमेदवाराने व्यक्त केली. नागरिकांनी स्वतःचा स्वाभिमान गहाण टाकून या सरकारसमोर लाळघोटेपणाच स्वीकारावा, असाच यामागे सरकारचा हेतू आहे काय, असाही सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
आज मुलाखतीसाठी एकूण ६७ उमेदवार सकाळपासून हजर होते. पण मुलाखतच संध्याकाळी साडेसहा वाजता सुरू झाल्याने फक्त दहाच उमेदवार शेवटी मुलाखतीसाठी उपस्थित राहिले, अशीही खबर प्राप्त झाली आहे. मुलाखतीवेळी संबंधित विषय बाजूला ठेवून आपलीच शेखी मिरवण्याची संचालकांची सवय उमेदवारांसाठी संतापजनक ठरली आहे. हा एकूण प्रकारच क्रीडा खात्याची लक्तरे वेशीवर टांगणारा ठरला आहे. संचालकांच्या या वागणुकीबाबत क्रीडामंत्री, मुख्यमंत्री तथा क्रीडा सचिवांकडेही अनेक तक्रारी पोचल्या आहेत पण हे प्रकरण हाताळण्याची कुणाचीच धमक राहिली नाही, अशीच समजूत सर्वांची बनली आहे. पैंगीणचे आमदार रमेश तवडकर यांनी विधानसभेत यापूर्वी क्रीडा संचालकांच्या या वागणुकीचे अनेक प्रकार सभागृहासमोर ठेवले होते. त्यावेळी क्रीडामंत्री बाबू आजगावकर यांनी तात्काळ कारवाई करण्याचेही आश्वासन दिले होते. दरम्यान, क्रीडामंत्र्यांचेही या संचालकांसमोर काहीही चालत नाही, अशी चर्चा खात्याअंतर्गत सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

No comments: