Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 10 April 2010

चीनच्या आयात बंदीमुळे गोव्यातील खाण उद्योजक संकटात?

पणजी, दि. ९ (प्रतिनिधी): चीनमधील खनिज व्यापारी संकुलांना कमी दर्जाचे लोह खनिज आयात करण्यास बीजिंगने बंदी घातल्याने गोवा खनिज निर्यातदार उद्योजकांसमोर भीषण संकट ओढवण्याची भीती निर्माण झाली आहे. लोहखनिज आयातीची सुमारे ४० वर्षांपूर्वीची पद्धत या बंदीमुळे निकालात काढण्यात आली आहे. यापूर्वी वार्षिक आयात कंत्राटी पद्धत रद्द करून तिमाही कंत्राटी पद्धत अवलंबण्याचा निर्णयही चीनने घेतल्याची खबर आहे. चीनच्या या निर्णयामुळे गोव्याचा वार्षिक ३० दशलक्ष टन लोह खनिज माल गोत्यात येण्याचा धोकाही निर्माण झाला आहे.
चीन देशात लोहखनिजाच्या वाढत्या मागणीच्या अनुषंगानेच गोव्यातील खनिज उद्योगाला महत्त्व प्राप्त झाले आहे. चीन देशाची लोह खनिजाची वार्षिक उलाढाल शंभर दशलक्ष टनावर पोचल्याची माहिती अलीकडेच मुरगाव पोर्ट ट्रस्टच्यावतीने देण्यात आली होती. गोव्यातील लोह खनिज कमी दर्जाचे असल्याने देशातील स्टील कंपन्यांकडून त्याला अजिबात मागणी नाही. हा कमी दर्जाचा माल केवळ चीन देशातच जातो. गोव्यातून २००९-१० या वर्षात निर्यात झालेल्या खनिजात ४०.३२ दशलक्ष टन केवळ लोह खनिज आहे व त्यातील ३६.२२ दशलक्ष टन लोह खनिज हे केवळ चीन देशात निर्यात करण्यात आले आहे. गोवा खनिज निर्यातदार संघटनेचे अध्यक्ष शिवानंद साळगावकर यांनी एका स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना या बंदीबाबत चिंता व्यक्त केली आहे. ही बंदी कायम न राहता तात्पुरती ठरो, असेही ते म्हणाले. श्री. साळगावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार गोव्यातील सुमारे ७० टक्के लोह खनिज हे कमी दर्जाचे आहे. एकूण लोह खनिजांपैकी ७० टक्के लोहखनिज हे चीनला निर्यात होते व त्यातील ८० टक्के खनिज कमी दर्जाचे असते. गोव्यातून निर्यात होणाऱ्या ५२ दशलक्ष टन खनिजापैकी ३० दशलक्ष टन खनिजावर या बंदीचा थेट परिणाम होणार आहे. यामुळे लोह खनिज निर्यातदारांसाठी ही बंदी चिंतेचीच बाब असल्याचेही त्यांनी मान्य केले.
दरम्यान, मुरगाव बंदर अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार गोव्यातील लोहखनिजाचा चीन हाच मोठा ग्राहक आहे. गोव्यातून मुरगाव बंदराच्या माध्यमातून खनिज निर्यात करणाऱ्या कंपन्यांचा आकडा ७६ वर पोचला आहे. सेझा गोवा लिमिटेड ही लोहखनिज निर्यात करणारी सर्वांत मोठी कंपनी आहे. २००९-१० या काळात या कंपनीतर्फे ११५.३१ लाख टन लोहखनिजाची निर्यात झाली आहे. आता चीनने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे सर्व खाण उद्योजक धास्तावले आहेत.

No comments: