ग्रीन गोवाकडून सरकारला नोटीस रेव्ह पार्टीची भीती
मडगाव, दि. ६ (प्रतिनिधी): दक्षिण गोव्यातील मोबर-केळशी येथील किनाऱ्यावर येत्या ८ ते १० एप्रिल असे तीन दिवस संगीत व नृत्य महोत्सव आयोजित करण्यासाठी मुंबईतील एका संघटनेला परवाना देण्याच्या पर्यटन खात्याच्या कृतीविरुद्ध ग्रीन गोवा फाउंडेशन या बिगरसरकारी संघटनेने आपल्या वकिलांमार्फत मुख्य सचिवांवर कायदेशीर नोटिस बजावली आहे.
दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक, कोलवा पोलिस निरीक्षक, गोवा किनारी विभाग व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य सचिव, दक्षिण गोव्याचे जिल्हा दंडाधिकारी व पर्यटन संचालक यांनाही या नोटिशीत प्रतिवादी करण्यात आले आहे.
ऍड. एस. कोठारे यांच्यामार्फत पाठविलेल्या या नोटिशीनुसार मुंबईतील एएएआय गोवा फिस्ट क्रिएटीव्ह पुरस्कार महोत्सव नामक संस्थेने या कार्यक्रमासाठी अर्ज केल्यानंतर त्यांना परवाना देण्यात आला. या महोत्सवात कर्णकर्कश आवाजात संगीत लावले जाणार असून असून रात्री १० वाजल्यानंतर व पहाटेपर्यंत ते चालणार आहे. या प्रकरणी ग्रीन गोवाने यापूर्वी उच्च न्यायालयात गुदरलेल्या तीन याचिका व त्यावर खंडपीठाने दिलेले निवाडे यांचा उल्लेख करून, तरीही त्याकडे दुर्लक्ष करून दिलेल्या परवान्यामुळे न्यायालयाचा अवमान होत असल्याचे म्हटले आहे.
एक बहुराष्ट्रीय कंपनी या महोत्सवामागे असून केळशीतील सार्वजनिक किनाऱ्यावर दोन हजार चौ.मी. क्षेत्रात तात्पुरते बांधकाम या महोत्सवासाठी करण्यास परवानगी देण्याच्या कृतीलाही नोटिशीत आक्षेप घेण्यात आला आहे. यामुळे लोकांच्या किनाऱ्यावरील हालचालींवर निर्बंध येतील असे त्यात म्हटले आहे. या पूर्वीच्या अनुभवावरून अशा पार्ट्यांचे प्रत्यक्षात स्वरूप "रेव्ह पार्ट्यां'प्रमाणेच असते अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.
हा परवाना देताना सर्व नियम धाब्यावर बसविले गेले आहेत. हा महोत्सव जरी "गोवा फिस्ट' असे सोज्वळ नाव धारण करीत असला तरी प्रत्यक्षात तेथे गोमंतकीयांना प्रवेश नसणार तर जगभरातून हजारो मंडळी दाखल होणार आहेत. यामुळे ही संख्या येथील किनारी गावासाठी संकट ठरण्याची भीती आहे. कारण इतक्या संख्येतील लोकांसाठी तेथे कोणत्याच पायाभूत सुविधा नाहीत. या महोत्सवासाठीच्या निमंत्रणपत्रिका काही महिन्यांपूर्वीच रवाना झाल्या होत्या, अशी माहितीही आता बाहेर आली आहे. यावरून आयोजकांनी गोवा सरकारला गृहीत धरूनच ही सगळी आखणी केली आहे, हे स्पष्ट होत असल्याचे नोटिशीत म्हटले आहे.
या सर्व तपशिलावरून सदर महोत्सव हा फक्त गोमंतकीयांची दिशाभूल करणारे सोज्वळ नाव धारण करत असल्याने या महोत्सवाला दिलेला परवाना ताबडतोब मागे घ्यावा, अन्यथा उच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या निवाड्याचा उपमर्द केल्याबद्दलची अवमान याचिका गुदरणे भाग पडेल असा इशारा देण्यात आला आहे.
यापूर्वी आगोंद-काणकोण येथे असाच एक महोत्सव (चक्रव्ह्यू)आयोजित करण्याचा बेत रद्द करण्यात आला होता. लोकांनी त्याला विरोध केल्यामुळे व राज्यभरातून त्याविरुद्ध संतप्त प्रतिक्रिया उमटल्यावर उपजिल्हाधिकाऱ्यांना या महोत्सवाचा परवाना मागे घेणे भाग पडले होते. या महोत्सवासाठी येऊन दाखल झालेल्या देशभरातील लोकांना कर्नाटकातील किनाऱ्यावर नेण्यात आले होते. या नंतरचा हा दुसरा प्रकार असून या आयोजकांनी गोवा सरकार व येथील अधिकारी यांना कसे खिशात टाकले आहे तेच दिसून येत असल्याचे स्पष्ट होत आहे.
Wednesday, 7 April 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment