Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday, 8 April 2010

नक्षलवाद्यांच्या विरोधात प्रसंगी वायुसेनेचा वापर

केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम
जगदलपूर, दि. ७ : छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात काल नक्षलवाद्यांनी सीआरपीफच्या जवानांवर केलेल्या भ्याड हल्ल्याबाबत तात्काळ कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त करणे योग्य ठरणार नाही. परंतु, नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी वायुसेनेची मदत घेण्याबाबत सरकार पुनर्विचार करू शकते, असे केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी म्हटले आहे.
माओवादी नक्षलवाद्यांनी सरकारवर युद्ध थोपण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे नक्षलवादाचा बिमोड करून भारताच्या लोकशाहीला वाचविण्यासाठी याक्षणी आम्ही शांत राहून आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे, असे चिदंबरम यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. कालच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ते आज येथे आले आहेत.
नक्षलवाद्यांचा सामना करण्यासाठी लष्कराचा उपयोग केला जाण्याची शक्यता त्यांनी यावेळी स्पष्टपणे फेटाळून लावली. या प्रवृत्तीचा खात्मा करण्यासाठी राज्य पोलिस आणि निमलष्करी दलाचे जवान सक्षम आहेत, असे ते म्हणाले. याकामी वायुसेनेची मदत न घेण्याचा निर्णय आम्ही याआधी घेतला होता. मात्र, तशी गरज पडल्यास सरकार याबाबतीत निश्चित पुनर्विचार करेल, असे गृहमंत्र्यांनी सांगितले.
------------------------------------------------------------------
शहीद जवानांना गृहमंत्र्यांची श्रद्धांजली
जगदलपूर, दि. ७ : छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यातील जंगलात माओवादी नक्षलवाद्यांनी काल केलेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफ आणि राज्य पोलिसांच्या जवानांना केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी आज भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी चिदंबरम यांचे रायपूरमार्गे आज येथे आगमन झाले. कालच्या हल्ल्यात शहीद झालेल्या ७६ जवानांपैकी ७५ जवान सीआरपीफचे, तर एक जवान राज्य पोलिसांचा होता. तिरंगा झेंड्यात गुंडाळलेल्या शहीद जवानांंच्या मृतदेहांवर चिदंबरम यांनी पुष्पचक्र वाहून राष्ट्रातर्फे त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी छत्तीसगडचे राज्यपाल शेखर दत्त, मुख्यमंत्री डॉ. रमणसिंग, वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि तसेच निमलष्करी दलांंचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आल्यानंतर पोलिसांनी हवेत गोळीबाराच्या फैरी झाडून आणि बंदुकी उलट्या करून आपल्या सहकाऱ्यांना अखेरची मानवंदना दिली. चिदंबरम यांनी शहीद जवानांच्या कुटुंबीयाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. यावेळचे वातावरण अतिशय भावुक झाले होते.

No comments: