एक कोटीचे नुकसान
वास्को, दि. ९ (प्रतिनिधी): साकवाळ औद्योगिक वसाहतीतील "फाइन पेट' या कारखान्यात लागलेल्या भीषण आगीमुळे येथे असलेली यंत्रणा, सामग्री व इतर सामान बेचिराख होऊन सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान झाले. आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली, यावेळी घटनास्थळी कोणीच उपस्थित नसल्याने सुदैवाने प्राणहानी टळली. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वास्को अग्निशामक दलातर्फे वर्तवण्यात येत आहे.
आज पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास साकवाळ औद्योगिक वसाहतीतील "फाइन पेट' या प्लॅस्टिक बाटल्या बनवणाऱ्या कारखान्यात आग लागल्याचे येथून जाणाऱ्या एका व्यक्तीच्या लक्षात आले. या घटनेची माहिती अग्निशामक दलाला देण्यात आली. यावेळी वास्को तसेच वेर्णा अग्निशामक दलाचे तीन बंब घटनास्थळी रवाना झाला. परंतु, कारखाना बंद असल्याचे आढळून आल्याने प्रथम त्यांनी ह्या कारखान्याच्या गेटचे टाळे तोडून आत प्रवेश करून नंतर खिडकीचे आरसे तोडून आग विझवण्याच्या कार्यास सुरुवात केली. आग एवढी भीषण होती की तिच्यावर नियंत्रण आणण्यासाठी अग्निशामक दलाला कारखान्याच्या शटरचे टाळे तोडून आत प्रवेश करावा लागला.
वास्को व वेर्णा अशा दोन अग्निशामक दलाच्या एकूण १२ कर्मचाऱ्यांनी सुमारे एक तास अथक परिश्रम घेऊन आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत कारखान्यातील सर्व सामान, यंत्रणा, कारखान्याचे छप्पर व इतर गोष्टी खाक झाल्या होत्या. या कारखान्याचे मालक उदय नाईक यांना एक कोटीची नुकसानी सोसावी लागल्याची माहिती देताना वास्को अग्निशामक दलाचे प्रमुख बॉस्को फेर्रांव यांनी कारखान्याच्या बाजूला असलेली सुमारे पन्नास लाखाची मालमत्ता वाचवण्यात आल्याचे सांगितले. या कारखान्यात प्लॅस्टिक बाटल्या बनवण्यासाठी सुमारे दोन टन कच्चा माल साठवण्यात आला होता. या मालासहित सुमारे २४० चौ.मी. क्षेत्रफळाच्या या कारखान्यातील सर्व गोष्टी जळून राख बनल्याचे त्यांनी सांगितले. आग लागण्यामागचे कारण अजून पर्यंत स्पष्ट झाले नसून शॉर्ट सर्किटमुळे सदर घटना घडली असावी असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. येथील विजेचा दाब कमी जास्त होत असल्याची शंका व्यक्त करताना त्यामुळेच या वसाहतीत आग लागण्याच्या अनेक घटना घडल्याची शक्यता व्यक्त केली. साकवाळ औद्योगिक वसाहतीत यापूर्वीही आग लागण्याची अनेक घटना घडल्याचे श्री. फेर्रांव यांनी सांगितले. ६ नोव्हेंबर २००९ रोजी रितिका पॅकेजिंग ह्या कारखान्यात आग लागल्यामुळे २० लाखांची हानी झाली होती.
दरम्यान कारखान्याचे मालक उदय नाईक यांनी कारखान्यात प्लॅस्टिक बाटल्या बनवण्याचा सुमारे साठ लाखाचा कच्चा माल, २५ लाखाची यंत्रणा तसेच कारखान्याचे छप्पर आदी वस्तूंची किंमत एक कोटीजवळ पोचत असल्याचे सांगितले. येथील वीजपुरवठ्यात मोठ्या प्रमाणात बिघाड असल्याचा दावा त्यांनी केला.
वेर्णा पोलिसांनी सदर घटनेचा पंचनामा केला असून अग्निशामक दल तसेच पोलिस पुढील तपास करीत आहेत.
Saturday, 10 April 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment