Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday, 8 April 2010

'गोवा फीस्ट'ला परवाना थेट गृहखात्याकडूनच?

मडगाव, दि. ७ (प्रतिनिधी): मोबर-केळशी येथील किनाऱ्यावर ८ ते १० एप्रिल दरम्यान होणाऱ्या "गोवा फीस्ट' या तीन दिवसीय संगीत व नृत्य महोत्सवासाठी मुंबईतील एका आस्थापनाला परवाना देण्यासाठी गृहखात्याने विशेष उत्सुकता दाखवल्याचे उघडकीस आलेले असून त्यामुळेच पर्यटन खात्याने या प्रकरणात कोणतीच कठोर भूमिका निभावलेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
ग्रीन गोवा फाउंडेशननेया महोत्सवाच्या विविध मुद्यांवर हरकती घेऊन वकिलांमार्फत मुख्य सचिवांना नोटीस पाठवली असली तरी परवान्यामागे खुद्द गृह खात्याचे युद्ध पातळीवर प्रयत्न असल्याचे दिसून आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. प्रथम या प्रकरणाची फाईल जिल्हाधिकाऱ्यांकडे आली असता त्यांनी अशा कार्यक्रमांना परवानगी देण्याचा अधिकार आपणाला नसल्याचे सांगून ती फाईल गृहखात्याच्या अवर सचिवांकडे पाठविली होती. त्यानंतर आयोजकांनी गृहखात्याच्या सदर अधिकाऱ्यामार्फत दक्षिण गोवा प्रशासन व पोलिसांवर दबाव आणून परवाने मिळविण्याचे प्रयत्न चालविले. यावेळी गृहखात्यानेच गेल्या काही महिन्यांमागील आगोंद येथील "चक्रव्ह्यू' पार्टीच्या प्रकरणानंतर अशा कार्यक्रमांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी ध्वनी प्रदूषण व इतर बाबतीत परवाना घेण्याचा अधिकार काढून घेतल्याचे निदर्शनास आणून दिले. यासंदर्भात गृहखात्यानेच निर्णय घेणे उचित होईल असे त्यांनी सांगितल्याचे समजते. मात्र या महोत्सवाला नेमका कोणी परवाना दिला ते गुलदस्त्यात असल्याचे दिसून येते.
दरम्यान, ग्रीन गोवा फाउंडेशनने वकिलांमार्फत दिलेली नोटीस सरकारसाठी अडचणीची ठरली आहे. ती संघटना न्यायालयात गेली तर सरकारसाठी ती नाचक्कीची बाब ठरणार आहे. यासाठी आज सायंकाळपर्यंत येथे उच्चस्तरावर जोरदार खलबते चालू होती.
दरम्यान, या संगीत महोत्सवाला परवानगी मिळवून देण्यासाठी काही ज्येष्ठ मंत्री आज दिवसभर प्रयत्न करीत होते.

No comments: