पणजी, दि. ५ (प्रतिनिधी): न्यायालयाकडून देण्यात आलेल्या अंमली पदार्थाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी पोलिस उपमहानिरीक्षकाच्या अध्यक्षतेखाली बनवण्यात आलेल्या समितीची असून गेल्या सुमारे दहा वर्षात या समितीने अंमली पदार्थाची विल्हेवाट का लावली नाही? गेल्या दहा वर्षात शेकडो किलो अंमली पदार्थ मालखान्यात पडून राहिला आणि त्याच्यावर कोणी आणि कसा हात साफ केला, याचा शोध सध्या गुन्हा अन्वेषण विभाग घेत आहे. या समितीवर गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस अधीक्षक, पोलिस मुख्यालयाचे पोलिस अधीक्षक आणि अन्न व औषध खात्याचे संचालक यांचा समावेश आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणात "मांजरीप्रमाणे डोळे मिटून दूध पिण्याचा' प्रकार घडला असण्याची शक्यता असल्याचे बोलले जाते आहे.
गुन्हा अन्वेषण विभागाने अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या विभागात असलेल्या मालखान्याची पाहणी पूर्ण केली असून येत्या काही दिवसांत याचा अहवाल पोलिस उपमहानिरीक्षकांना सादर केला जाणार असल्याचे या विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. त्याचप्रमाणे, राज्यातील विविध पोलिस स्थानकांच्या पोलिसांनी किती अंमली पदार्थ पकडला आणि सुनावणी संपल्यानंतर न्यायालयाने विल्हेवाट लावण्यासाठी किती अंमली पदार्थ परत केला, याची तपासणी केली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यामुळे "एनडीपीएस' न्यायालयात असलेल्या मालखान्याची तपासणी करण्याची परवानगी मिळवण्यासाठी गुन्हा अन्वेषण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने न्यायालयाला पत्र लिहिले आहे.
प्रत्येक वेळी अंमली पदार्थाची पाहणी करून त्याची विल्हेवाट लावणे या समितीचे काम होते. २००१ साली तत्कालीन गोवा पोलिस खात्याचे पोलिस महासंचालक गुरुचरणसिंग सांधू यांच्या कार्यकाळापासून न्यायालयाने विल्हेवाट लावण्यासाठी दिलेला अंमली पदार्थ मालखान्यात पडून आहे.
अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या विभागात असलेल्या मालखान्यातील अनेक बंद पाकिटांचे "सील' तोडल्याचे आणि काही बंद पाकिटातील अंमली पदार्थ खराब झाल्याचे गुन्हा अन्वेषण विभागाच्या पाहणीत आढळून आले आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
Tuesday, 6 April 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment