Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday, 7 May 2009

जुवारी पुलाला तडा जात असल्याचे उघड

पणजी, दि. ६ (प्रतिनिधी) - जुवारी पुलाच्या गेल्या ३ मे रोजी करण्यात आलेल्या चाचणीत पुन्हा एकदा पुलाला बारीक तडा जात असल्याचे उघडकीस आल्याने सार्वजनिक बांधकाम खात्याची झोप उडाली आहे.
हा तडा गंभीर स्वरूपाचा नाही. तथापि, नव्या पुलाबाबत आता राज्य सरकारने गांभीर्याने विचार करण्याची वेळ आल्याची प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. नव्या पुलाच्या बांधकामाला किमान पाच वर्षे लागतील. १९९८ साली जुवारी पुलाची मोठी दुरुस्ती करण्यात आली व तेव्हा सदर कंपनीकडून १५ वर्षाची हमी देण्यात आली होती. हा काळ पुढील पाच वर्षात संपतो. त्यामुळे नव्या पुलाचे बांधकाम यावर्षी सुरू झाले नाही तर उत्तर व दक्षिण गोव्याला जोडणारा हा दुवा धोक्यात येण्याची भीती निर्माण झाली आहे.
कुठ्ठाळी येथील जुवारी नदीवरील या महत्त्वाच्या पुलाबाबत पुन्हा संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या ३ मे रोजी या पुलाची चाचणी केली असता खांब क्रमांक ६ व ७ या दरम्यान या पुलाला नव्याने तडा जात असल्याचे आढळले आहे. हा तडा गंभीर स्वरूपाचा नसल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम खात्याने केला असला तरी या पुलाची जीर्णवस्था पाहता यापुढे या पुलाची हमी देणे कठीण बनणार असल्याची माहिती खास सूत्रांनी दिली. याप्रकरणी अधिकृत प्रतिक्रिया देण्यास सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी नकार दिला.
राज्यात अजूनही आचारसंहिता लागू असल्याने वक्तव्य करणे योग्य नसल्याचे कारण पुढे करण्यात आले आहे. दरम्यान, गेल्या २००६ साली पुलाच्या एका खांबाला तडा गेल्याने हा पूल वाहतुकीस धोकादायक बनल्याचे जाहीर करून खबरदारीचा उपाय म्हणून या पुलावरील अवजड वाहतूक ताबडतोब बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
सदर पुलाच्या सुरक्षेबाबत अनेक वेळा प्रश्नचिन्ह निर्माण होऊनही सरकारच्या वेळकाढू वृत्तीमुळे या पुलाचा विषय रेंगाळत पडला आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी जुवारी नदीवरील नव्या पुलाच्या कामाला चालना देण्याचे वचन दिले आहे. सध्याच्या जुवारी पुलाशेजारीच कोंकण रेल्वेने पूल बांधला तेव्हाच त्यांनी जुवारी पुलाला समांतर पूल बांधण्याचा प्रस्ताव सादर केला होता, मात्र तत्कालीन राज्य सरकारने तो धुडकावला होता. २८ फेब्रुवारी २००० रोजी संसदेत प्रश्नोत्तराच्या वेळी उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांनी यासंबंधी प्रश्न उपस्थित केला असता त्यांना केंद्रीय भूपृष्ठ राज्यमंत्री डॉ. देवेंद्र प्रधान यांनी सदर पूल कमकुवत बनल्याने अवजड वाहनांसाठी बंदी घालण्यात आल्याचे सांगितले होते. नंतर जानेवारी २००१ साली अवजड वाहतुकीसाठी हा पूल बंद करण्यात आला होता.

No comments: