Tuesday, 5 May 2009
बेतूल औद्योगिक वसाहतीचा मार्ग खुला
खाणमालकाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
पणजी, दि. ४ (प्रतिनिधी) - बेतूल औद्योगिक वसाहतीसाठी भूसंपादन करण्याच्या प्रक्रियेला आव्हान देणारी खाणमालक प्रविणकुमार घोसाळीया यांची विशेष अनुमती याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्याने आता या औद्योगिक वसाहतीचा मार्ग खुला झाला आहे.या भूसंपादन प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी सुरुवातीस मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने फेटाळल्यानंतर विशेष अनुमती याचिकेमार्फत या भूसंपादनाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.
याप्रकरणी प्राप्त माहितीनुसार बेतूल येथील नियोजित औद्योगिक वसाहतीसाठी गोवा औद्योगिक विकास महामंडळातर्फे सुमारे साडेआठ लाख चौरसमीटर जागेची संपादन प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. या प्रविणकुमार घोसाळीया यांची बॉक्साईट खाण होती व त्यांनी या भूसंपादन प्रक्रियेला आव्हान दिले होते. मुळातच श्री.घोसाळीया यांनी सरकारकडे केलेल्या करारानुसार ८८ लाख चौरसमीटर जागा बॉक्साइट खाणीसाठी करारावर घेतली होती. हा करार १९६८ साली करण्यात आला होता व त्याची अंतिम मुदत १९९८साली संपली.या ठिकाणी खाणीला लोकांचा वाढता विरोध तर होताच परंतु ही जागा औद्योगिक वसाहतीला संपादीत करण्यात येत असल्याने ही जागा कोणत्याही पद्धतीत पुन्हा एकदा खाणीसाठी देण्याचा प्रश्नच नव्हता,अशी प्रतिक्रिया केपेचे आमदार तथा गोवा औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष बाबू कवळेकर यांनी व्यक्त केली.बेतूल येथील ही जागा विशेष करून फुडपार्कसाठी निश्चित करण्यात आली होती. मुळात एवढी जागा फुडपार्कला का,असा सवाल करून काही लोकांनी या प्रकल्पाला विरोध केला होता. यानंतर औद्योगिक विकास महामंडळाने ही जागा औद्योगिक वसाहतीसाठी निश्चित केली असून या वसाहतीचा काही भाग हा फुडपार्कसाठी निश्चित केला होता.
केपेचा आमदार या नात्याने आपण आपल्या मतदारसंघात औद्योगिक वसाहत स्थापण्याचे वचन मतदारांना दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने या वसाहतीसाठीच्या भूसंपादनाचा अडसर दूर केल्याने आता या प्रकल्पाला चालना मिळवून देण्यात येणार असून बेतूल औद्योगिक वसाहतीचा मार्ग या निकालामुळे खुला झाल्याचेही ते म्हणाले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment