मुंबई, दि. ५ : सातत्याने काहीतरी नवे घडणाऱ्या मुंबई हल्ल्यातील आरोपी कसाबच्या खटल्याच्या सुनावणीत आज बचाव पक्षाच्या वकिलांनी सर्व आरोपींची फाशीची शिक्षा वाचविण्यासाठी भारतीय दंड विधानातील त्रुटींचा वापर करण्याचा मार्ग अवलंबिला. कसाब हा जम्मू-काश्मीर मुक्ती संग्रामातील योद्धा असल्याचे सांगून त्याला भारताविरुद्ध युद्ध पुकारल्याचा आरोप लागू होत नाही, असा नवाच युक्तिवाद त्याच्या वकिलांनी आज केला.
मुंबई हल्ल्यात पकडण्यात आलेला एकमेव अतिरेकी मोहम्मद अजमल आमीर कसाब याच्याविरुद्ध एकूण ३१५ आरोप ठेवण्यात आले आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचा आरोप भारताविरुद्ध युद्ध पुकारणे, हा आहे. या आरोपाच्या अनुषंगाने कसाबला कठोरतम शिक्षा होऊ शकते. या शिक्षेपासून कसाबचा बचाव करण्यासाठी त्याच्या वकिलांनी आज हा आरोप कसाबवर लागू होत नसल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न चालविला. त्यांनी म्हटले की, कसाबचा मुंबई हल्ल्यातील समावेश हा जम्मू-काश्मीर मुक्ती संग्रामाचा एक भाग आहे. भारतीय दंड विधानाच्या कलम १८ नुसार जम्मू-काश्मीर हे भारताचा भाग मानले जाऊ शकत नाही. त्यामुळे कसाबने भारताविरुद्ध युद्ध पुकारले, हा आरोप यात अंतर्भूत केला जाऊ शकत नाही. याच पार्श्वभूमीवर कसाबविरुद्धचा उपरोक्त युद्ध पुकारल्याचा आरोपही आरोपपत्रातून गाळला जावा, अशी मागणी त्याच्या वकिलांनी केली.
ही त्यांची मागणी मंजूर झाली आणि देशाविरुद्ध युद्ध पुकारल्याचा आरोप हटविण्यात आला तर कसाब मृत्यूदंडापासून वाचू शकतो.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment