Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 9 May 2009

विश्वजितविरुद्ध अखेर आरोपपत्र दाखल

- कसून चौकशी करण्याची तपास अधिकाऱ्यांना सूचना
- मंत्रिपद राहणार की जाणार याबद्दल लोकांत उत्सुकता

पणजी, दि. ८ (प्रतिनिधी) : ऍड. आयरिश रॉड्रिगीस यांना दिलेल्या कथित धमकी प्रकरणी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्याविरुद्ध अखेर आज जुनेगोवे पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या ५०६(२) या कलमाखाली आरोपपत्र दाखल केले.
मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने यासंबंधी दिलेल्या आदेशानुसार ७५ पानी आरोपपत्राची प्रत उच्च न्यायालयासमोर ठेवण्यात आली. आरोपपत्राचे प्रत्येक पान न्याहाळल्यानंतर न्यायमूर्ती श्रीमती रोशन दळवी यांनी जुने गोवे पोलिस स्थानकाचे निरीक्षक गुरूदास गावडे यांना या प्रकरणाची कसून चौकशी करा व संशयित आरोपीविरोधात कायद्यानुसार कारवाई करा,अशी सूचना केली.
माजी वित्तमंत्री दयानंद नार्वेकर यांच्यानंतर आता आरोपपत्र दाखल होणारे विश्वजित राणे हे विद्यमान मंत्रिमंडळातील दुसरे मंत्री ठरले आहेत. आरोपपत्र दाखल झालेल्या नेत्याने मंत्रिपदावर राहण्यास कॉंग्रेस श्रेष्ठींचा सक्त विरोध आहे, नार्वेकर यांना मंत्रिपदावरून खाली खेचण्यासाठी मुख्यमंत्री कामत यांनी हाच "फॉर्म्युला' अवलंबला होता. आता मुख्यमंत्री कामत यांच्याकडून आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनाही हाच फॉर्म्युला लागू करणार काय, असा सवाल केला जात आहे.
मुख्यमंत्री सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. ते गोव्यात परतल्यानंतरच याबाबत काय ते स्पष्ट होईल. माजी वित्तमंत्री तथा हळदोण्याचे आ मदार ऍड.दयानंद नार्वेकर हेदेखील विदेश दौऱ्यावर असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांकडून देण्यात आली. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया मिळाली नाही. विश्वजित राणे हेदेखील गोव्यात नसल्याची माहिती मिळाली आहे.
ऍड.आयरीश यांना धमकी प्रकरणातील चौकशी अधिकारी पोलिस निरीक्षक गावडे यांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात ८ साक्षीदारांची नोंद करण्यात आली आहे. त्यात तत्कालीन उत्तर गोवा अधीक्षक नीरज ठाकूर, विश्वजित राणे यांच्या पत्नी दिव्या राणे, गुन्हे विभागाचे अधीक्षक विश्राम बोरकर, तत्कालीन उत्तर गोवा अधीक्षक शेखर प्रभुदेसाई, आयडिया सेल्युलर सर्व्हिस (पणजी)चे संपर्क अधिकारी सचिन शिंदे, उत्तर गोवा जिल्हा निबंधक कार्यालयाचे निरीक्षक व्ही.साळकर, जुनेगावे पोलिस स्थानकाचे माजी निरीक्षक विश्वेश कर्पे व सध्याचे निरीक्षक गुरूदास गावडे यांचा समावेश आहे.
गोळ्या घालून ठार करण्याची धमकी ३१ जुलै २००७ रोजी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी मोबाईलवरून आपणास दिल्याची तक्रार ऍड.आयरिश यांनी जुनेगोवे पोलिस स्थानकांत नोंदवली होती. मुळात ही तक्रार नोंद करून घेण्यासच २२ दिवस लावण्यात आले.नंतर ऍड.आयरिश यांनी सातत्याने या प्रकरणाचा पाठपुरावा केल्यानंतर विश्वजित राणे यांच्यावर अखेर आरोपपत्र दाखल करण्यात आले. उच्च न्यायालयात सरकारी वकिलामार्फत आरोपपत्र दाखल करण्याचे वचन देऊनही जुनेगावेचे निरीक्षक गुरूदास गावडे यांच्याकडून या प्रकरणाची फाईल बंद करण्याचे प्रयत्न झाल्याने ऍड.आयरिश यांनी त्यांच्याविरोधात अवमान याचिका दाखल केली होती. विश्वजित राणे यांनी ही धमकी देण्यासाठी आपली पत्नी सौ. दिव्या यांचा मोबाईल वापरल्याचे उघड झाले होते. त्यामुळे सौ. दिव्या यांनाही या प्रकरणात सहआरोपी करून घेण्याची मागणी ऍड. आयरिश यांनी केली होती. ती मागणी फेटाळल्यानंतर आयरिश यांनी याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेस अनुसरून सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला नोटीसही जारी केली आहे.

No comments: