युवक मेळाव्याचे पर्वरीत उद्घाटन
पणजी, दि.२ (प्रतिनिधी) - "एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ' या उक्तीप्रमाणे अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाजाच्या बांधवांनी आता संघटित होऊन परस्परांना साहाय्य करण्याची वेळ आली आहे. या समाजातील बांधव आज विविध क्षेत्रांमध्ये उच्चपदी पोहोचले आहेत. त्यांच्या यशाचा उपयोग समाजातील युवा पिढीला व्हावा व त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ त्यांना मिळावा यासाठी युवा मार्गदर्शन मेळाव्यांची गरज आहे,असे प्रतिपादन अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाजाचे अध्यक्ष संतोबा देसाई यांनी केले.
पर्वरी येथील समाजाच्या छत्रपती शिवाजी मंदिर सभागृहात आयोजित केलेल्या युवा मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर उपाध्यक्ष डॉ.उल्हास परब,सचिव सुभाष फळदेसाई,राया नाईक,ऍड.अर्जुन शेटगावकर व आर.जी.देसाई आदी उपस्थित होते.
संतोबा देसाई म्हणाले, अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाज संघटनेचे कार्य तळागाळातील समाजबांधवांपर्यंत पोहचण्याची गरज आहे व त्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा. समाजातील कोणताही घटक दुर्लक्षित राहू नये,यासाठी परस्परांना सहकार्य करून पुढे जाण्यासाठी एकदिलाने प्रयत्न व्हावेत.समाज संघटनेतर्फे विविध कार्यक्रम हाती घेतले जात असले तरी हे कार्य अद्याप या समाजाच्या तळापर्यंत पोहचलेले नाही. राज्यातील समाजाच्या सर्व लोकांनी या संघटनेच्या छत्राखाली एकत्र येऊन या समाजाची ताकद सिद्ध करावी.
शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या किंवा अन्य काही कारणांमुळे मागे राहणाऱ्या बांधवांना समाजबंधूंनी मदतीचा हात द्यावा. तसेच समाजाच्या युवा पिढीने विविध क्षेत्रांत यश मिळवून समाजाचे नाव उज्ज्वल करावे,असे आवाहन श्री.देसाई यांनी केले.
मेळाव्यात विविध विषयांवर मान्यवरांनी उपस्थित युवकांना मार्गदर्शन केले. त्यात सरकारी वकील ऍड.सुभाष सावंतदेसाई,माजी शिक्षण उपसंचालक रायू नाईक,सुभाष फळदेसाई व डॉ.उल्हास परब यांचा समावेश होता. डॉ. परब यांनी प्रास्ताविकात मेळाव्याचे प्रयोजन स्पष्ट केले आणि आभार मानले.
Sunday, 3 May 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment