Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday, 5 May 2009

"सीरियल किलर' महानंदची चौथ्या खुनाची कबुली

आणखी एका खुनाचा संशय!
पणजी, तिस्क उसगाव, दि. ४ (प्रतिनिधी)- "सीरियल किलर' महानंद नाईक याने चौथ्या खुनाची कबुली दिली असून १८ जून २००७ मध्ये केसर रघु नाईक या ३३ वर्षीय तरुणीचा सावर्डे येथे एका फॅक्टरीच्या मागे दुपट्याने गळा आवळून खून केल्याची कबुली दिली आहे. एकामागून एक खुनाचा उलगडा होत असल्याने आता या प्रकरणाला गंभीर स्वरूप प्राप्त झाले आहे. महानंद याने आणखी एका (म्हणजे पाचव्या) तरुणीचा खून केल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून सध्या पोलिस तिच्याविषयी त्याच्याकडे चौकशी करीत आहेत.
१९ जून २००७ रोजी राजाराम रघु नाईक (रा. रायचेमळ, मापा पंचवाडी- शिरोडा) यांनी आपली बहीण केसर रघु नाईक (वय ३३ वर्षे) ही १८ जून २००७ पासून बेपत्ता असल्याची तक्रार फोंडा पोलिसांत दिली होती.आपण "केशव' नावाच्या मुलाबरोबर सावर्डे येथे जाते. तो आपल्या आईवडिलांना दाखविण्यासाठी नेणार आहे. त्याने सोबत येताना सर्व सोने घालून यायला सांगितले आहे, असे केसर हिने घरात सांगितले होते. घरातून निघताना तिने बहिणीच्या ४ सोन्याच्या बांगड्या, एक सोन्याचा हार, एक सोन्याची साखळी घातली होती. ते एकूण सोने ६० ग्रॅम होते. केसरने त्यावेळी अंगावर चुडीदार व दुपट्टा परिधान केला होता.
फोटो पाहून ओळख पटली
हा "केशव' कुठला हे तिच्या आई व भावाला माहीत नव्हते. आज वृत्तपत्रावरील पहिल्या पानावर महानंद नाईक याचे छायाचित्र पाहिल्यावर हाच तो "केशव' म्हणून त्यांनी आरोपीला ओळखले. त्यांनी लगेच आज फोंडा पोलिस स्थानक गाठले व वर्तमानपत्रातील महानंदचे छायाचित्र दाखवून याच्यासोबत केसर सावर्ड्याला गेली होती, अशी माहिती दिली.
शरीरयष्टीने किरकोळ असलेला महानंद सोन्यासाठीच तरुणींना आपल्या खोट्या आणि फसव्या प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा. त्यानंतर त्यांना निर्जनस्थळी नेऊन त्या तरुणींशी शरीरसुखाची इच्छा प्रकट करून अंगावरील कपडे व दागिने उतरावयाला सांगायचा. त्यांच्या अंगावरील सर्व सोने स्वतःच्या ताब्यात घ्यायचा आणि तरुणी बेसावध असतानाच तिच्याच दुपट्ट्याच्या साहाय्याने गळा आवळून ठार करायचा.
निरीक्षक सी.एल. पाटील
पोलीस निरीक्षक सी.एल. पाटील यांच्या हुशारीमुळेच समाजात खुलेआम फिरणारा सीरियल किलर गजाआड झाला आहे. केवळ एका बेपत्ता तरुणाला आलेल्या दूरध्वनी महानंदचा असल्याचे आढळून आल्याने त्याला चौकशीला बोलावले होते. त्यानंतर मिळत गेलेल्या माहितीच्या आधारे चार खुनांचा व एका तरुणींवर सतत बलात्कार करणाऱ्या नराधमाचा पर्दाफाश झाला.
निरीक्षक पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक दीपक पेडणेकर, सचिन पन्हाळकर, संजय दळवी, पोलीस हवालदार सावळो नाईक (एमआरएफ), सोनु परब, महिला पोलीस शिपाई लक्षा आमोणकर यांनी महानंदाने केलेल्या अनेक खुनाची प्रकरणे उघड करण्यात मोलाची कामगिरी केली आहे.
-------------------------------------
केसर गरीब कुटुंबातील...
सावर्डे, (प्रतिनिधी) ः केसर ही गरीब कुटुंबातील असून तिच्या घरी चार बहिणी व दोन भाऊ असा परिवार आहे. एका बहिणीचा विवाह झालेला असून वडिलांचे पंधरा वर्षापूर्वी निधन झाले आहे. केसरचा एक भाऊ बेरोजगार असून दुसरा शाळेत शिपाई म्हणून काम करतो.
केसर ही आपली बहीण बेपत्ता झाल्याची तिचा भाऊ राजाराम याने स्थानिक पंच सदस्यांच्या मदतीने शिरोडा पोलिस स्थानकात तक्रार दिली होती. परंतु, दोन वर्षात बहिणीचा शोध न लागल्याने तिचा अज्ञाताने खून केला असावा अशीही शंका त्यांना आली होती. मात्र संशय घ्यावा तर कोणावर घ्यावा याच विवंचनेत तिचा परिवार होता.आज ना उद्या आपली बहीण घरी येईल याच आशेने त्यांनी पोलिसांच्या तपासावर विश्वास ठेवला होता.
केसर ही ढवळी फोंडा येथे फार्ममध्ये काम करत असताना तिची ओळख महानंद याच्याशी झाल्याची शक्यता तिच्या भावाने व्यक्त केली आहे. तसेच केसर बेपत्ता होण्यापूर्वी एक वर्ष अगोदर पंचवाडी येथील सुरत हरिश्चंद्र गावकर ही तरुणी अशाच रितीने नाहीशी झाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.
"केशव' या हाकेनेच खुनाची कबुली
पोलिस निरीक्षक सी.एल.पाटील यांनी तुरुंगात ठेवलेल्या महानंदला आज "केशव' या नावाने हाक मारली. त्यावेळी महानंद बिथरला. घामाने ओलाचिंब झाला. नंतर पोलिस निरीक्षक पाटील यांनी केसरचा फोटो महानंदला दाखविला आणि ही तरुणी कुठे,असे विचारले. त्यावेळी केसर नाईक हिला आपण १८ जून रोजी सकाळी सावर्डे येथे फॅक्टरीच्या मागील बाजूस नेऊन दुपट्याने गळा आवळून ठार मारल्याची कबुली त्याने दिली.त्यानंतर मृतदेह नदीत फेकून दिल्याचेही त्याने सांगितले.

No comments: