पणजी, दि. ६ - श्री क्षेत्र तपोभूमीचे संस्थापक प. पू. ब्रह्मानंद स्वामी महाराजांची सातवी पुण्यतिथी उद्या गुरुवार ७ मे रोजी तपोभूमी गुरुपीठात भक्तिभावाने साजरी करण्यात येणार आहे. प. पू. राष्ट्रसंत ब्रह्मानंदाचार्य स्वामींनी समाजाच्या कल्याणाचा ध्यास घेतला होता. स्वामींनी आपल्या अविरत सत्कार्याद्वारे इतरांकरिता स्वतः चंदनाप्रमाणे झिजले व हजारो लोकांच्या संसारात परिमळ फुलवला. पू. स्वामींच्या अशा अवर्णनीय, महान सत्कार्याप्रति कृतज्ञता म्हणून सालाबादप्रमाणे यंदाही स्वामींची पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन केले आहे. यावेळी स्वामी ब्रह्मेशानंदाचार्यांच्या उपस्थितीत संध्याकाळी ७ वा. विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. यावेळी सभापती प्रतापसिंग राणे व सौ. विजयादेवी राणे, उद्योगपती अशोकराव चौगुले, तसेच कायदेपंडित मनोहर उसगावकर यांचा गौरव केला जाणार आहे. कार्यक्रमास खानापुरचे आमदार प्रल्हाद रेमाणी, उज्जैन संस्कृत विद्यापीठाचे उपकुलगुरू किशोरजी मिश्र, आमदार दिलीप परुळेकर, दै. गोमंतकचे व्यवस्थापकीय संचालक सुभाष नाईक, नाशिकचे भालचंद्र बागड, मुंबई पालघरच्या पद्मनाभ संप्रदायाचे अध्यक्ष प. ल. राऊत उपस्थित राहणार आहेत.
यावेळी सकाळी ५ वा. काकड आरती, प्रातःस्मरण, ७ ते १२ पर्यंत नवदाम्पत्यांकडून समाधी मंदिरात महाभिषेक, त्यानंतर पाद्यपूजा होईल. यावेळी यजमान सौ. व श्री. सूजन नाईक हे यांना यजमानपदाचा मान मिळाला आहे. त्यानंतर आरती, दर्शन, व महाप्रसादाने सकाळच्या सत्राची सांगता होईल.
या कार्यक्रमास समस्त सांप्रदायिकांनी उपस्थित राहून गुरुकृपेस पात्र व्हावे असे आवाहन पद्मनाभ शिष्य संप्रदायाचे अध्यक्ष गुरुदास शिरोडकर, सचिव सच्चिदानंद नाईक, खजिनदार सुदेश नाईक यांनी केले आहे.
Thursday, 7 May 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment