मडगाव, दि.५ (प्रतिनिधी) : चौगुले कंपनीच्या शिपयार्ड कार्यालयाला काल रात्री लागलेल्या भयंकर आगीत संपूर्ण कार्यालय खाक होऊन सुमारे एक कोटी रुपयांच्या मालमत्तेची हानी झाली.
काल मध्यरात्रीनंतर लागलेली ही आग विझविण्यासाठी वेर्णा, मडगाव, फोंडा, कुडचडे, जुने गोवे,पणजी,वास्को येथून मिळून ८ अग्निशामक दलांनी धाव घेतली व आग विझवण्यासाठी १२ खेपा घालून ४८ हजार लिटर पाण्याचा मारा केला. आग विझवण्याचे काम आज दुपारपर्यंत सुरू होते.
अग्निशामक दलाचे तसेच पोलिस खात्याचे वरिष्ठ अधिकारी आगीचे वृत्त मिळताच घटनास्थळी आले. जुवारी नदीच्या काठावर हे शिपयार्ड असल्याने आगीचा उसळलेला लोट दूरवरवरूनही दिसत होता. या परिसरातील लोकांनी घटनास्थळी गर्दी केली . आगीचे नेमके कारण कळले नसले तरी ती शॉटसर्किटमुळे लागली असावी असे प्राथमिक चौकशीत आढळले आहे.
या आगीत ८ लॅपटॉप, ७५ संगणक, १८ वातानुकूलन यंत्रे, ११ खुर्च्या, ७० टेबले व ६ कपाटे खाक झाली. कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी आणलेल्या उच्च दर्जाच्या फर्निचरचा त्यात समावेश होता.
आग विझवण्याची मोहीम डी. डी. वेर्णेकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडली व त्यांना एस. आमोणकर, पी. जी. वेळीप, बी. बी. शेख, श्री. पाळणी, श्री. धावस्कर, एन. एच. वेर्णेकर, मॅथ्यू वाझ या संबंधीत स्टेशनवरील अधिकाऱ्यांनी तथा जवानांनी मदत केली.
Wednesday, 6 May 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment