उच्च न्यायालयाचा दंत महाविद्यालयाला आदेश
पणजी, दि. ४ (प्रतिनिधी) - दंत महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी देण्यात आलेले प्रवेश नियमबाह्य असल्याचे न्यायालयात उघड झाल्याने प्रवेश प्रक्रिया पुन्हा नव्याने घेण्याचा आदेश आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिला. राज्य सरकारने अचानक ६० टक्के गुण ग्राह्य धरून पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिल्याने आपल्यावर अन्याय झाल्याचा दावा करून दंत महाविद्यालयाचा विद्यार्थी गौरव नगर्सेकर यांनी गोवा खंडपीठात याचिका दाखल केली होती.
भारतीय दंत मंडळाच्या नियमानुसार प्रवेश देणे बंधनकारक असल्याचे यावेळी याचिकादाराच्या वकिलांनी न्यायालयात मांडले. परंतु, प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असल्याने आता बदल करणे कठीण असल्याचे यावेळी सरकारी वकिलानी न्यायालयाने आपल्या युक्तिवादात मांडले. न्यायालयाच्या आदेश आम्ही पुढच्या वर्षापासून लागू करतो, असे सरकारतर्फे सांगण्यात आले. मात्र, सरकारच्या दोनही सूचना फेटाळून लावून न्यायालयाने ही प्रक्रियाच नव्याने घेण्याचे आदेश दिले.
ज्या विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमात विशेष विषयात जेवढे गुण मिळतात त्यातील ६० टक्के गुण ग्राह्य धरून पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जातो. पूर्वी एकूण गुणांतून काढण्यात येणाऱ्या टक्केवारीतून प्रवेश दिला जात होता. सध्या महाविद्यालयाने जे नियम लागू केले आहेत, त्यानुसार विशेष विषयात ६० टक्के गुण मिळाले आहेत, त्याच विद्यार्थ्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे महाविद्यालयाने ऐनवेळी घेतलेल्या या निर्णयामुळे दंत महाविद्यालयाचा विद्यार्थी गौरव नगर्सेकर याला फटका बसला होता. हा नियम महाविद्यालय लागू करू शकत नाही, असा दावा त्याने आपल्या याचिकेत केला होता. भारतीय दंत मंडळाने घालून दिलेल्याच नियमांचे पालन झाले पाहिजे असा नियम असून गुणवत्ता यादीनुसार महाविद्यालयाने प्रवेश देण्याची मागणी त्याने केली होती.
Tuesday, 5 May 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment