Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday, 7 May 2009

दहशतवादी कसाबवर ८६ आरोप निश्चित

मुंबई, दि. ६ - भारताविरुद्ध युद्ध पुकारणे, नागरिकांची हत्या करणे, हत्येचा कट रचणे, खोटी कागदपत्रे तयार करणे, बेकायदा संघटनेचे सदस्य असणे, बेकायदेशीरपणे स्फोटके-शस्त्रास्त्र बाळगणे असे एकूण ८६ आरोप विशेष कोर्टाने आज दहशतवादी अजमल कसाबवर निश्चित केले आहेत. त्याशिवाय, मारले गेलेले नऊ दहशतवादी, सबाऊद्दीन, फहीम अन्सारी आणि पाकिस्तानातल्या ३५ वॉंटेड दहशतवाद्यांवरही गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. मात्र, कसाबने या आरोपांचा इन्कार केला. ये सबकुछ गलत है , हमे मंजूर नहीं, असे उत्तर त्याने गांभीर्याने दिले आणि नंतर तो छद्मी हसला.
२६ / ११ हल्ल्यातील एकमेव जिवंत दहशतवादी मोहम्मद अजमल कसाब आणि त्याच्या साथीदारांवर आज आरोप निश्चित होणार होते. त्यामुळे सगळ्यांचेच सुनावणीच्या आजच्या २२ व्या दिवसाकडे लक्ष लागले होते. पोलिसांनी चौकशीनंतर कसाबवर ठेवलेले आरोप विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी विशेष कोर्टात मांडले होते. त्यापैकी ८६ आरोप न्या. ताहिलियानी यांनी निश्चित केले. त्यात देशाविरुद्ध युद्ध पुकारल्याचा सगळ्यात गंभीर आरोप कसाबवर ठेवण्यात आलाय. त्याशिवाय, आर्म्स ऍक्ट, एक्सप्लोसिव्ह ऍक्टची कलमेही त्याच्यावर लावण्यात आली आहेत. सीएसटी स्टेशन आणि कामा हॉस्पिटल परिसरात ७२ नागरिकांना मारल्याचा गुन्हाही कसाबवर आहे. त्यापैकी सात जणांच्या शरीरात सापडलेल्या गोळ्या कसाबच्याच एके ४७ मधल्या असल्याचेही सिद्ध झाले. त्याशिवाय टॅक्सीमध्ये बॉम्ब ठेवल्याचाही आरोप त्याच्यावर आहे.

No comments: