वासंती गावडे हिच्या
अपहरणाचा गुन्हा नोंद
फोंड्यात प्रचंड खळबळ
फोंडा, दि.२ (प्रतिनिधी) - फोंडा भागातील दोन युवतींचे खून आणि एका युवतीवरील बलात्कार प्रकरणी फोंडा पोलिसांनी अटक केलेला संशयित आरोपी महानंद रामनाथ नाईक याने वडाळवाडा मडकई येथील कु. वासंती अनंत गावडे (१९ वर्षे) हिचे सप्टेंबर १९९५ मध्ये अपहरण करून तिचा खून केल्याची तक्रार तिचा मावसभाऊ रामनाथ गावडे (शिरशिरे - बोरी) याने फोंडा पोलिस स्थानकावर केली आहे. याप्रकरणी महानंद याच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सदर युवती बेपत्ता झाल्याची कसून चौकशी सुरू असून अद्याप संशयित महानंद याने याप्रकरणी कबुली दिलेली नाही.
संशयित महानंद याने सदर युवतीला नेल्याचे फोंड्यातील अनेकांनी पाहिलेले आहे. १९९५ साली या प्रकरणी चौकशीसुद्धा झाली होती. मात्र, बेपत्ता प्रकरणाचे गूढ उकलण्यात यश आले नव्हते. त्यावेळी संशयित महानंद हा फोंड्यात रिक्षा (जीए ०१ डव्लू ०९२९) चालवत होता. महानंद याला या प्रकरणी त्यावेळी अटक केल्यानंतर त्याने रिक्षाचालकांचा मोर्चा पोलिस स्थानकावर आणून पोलिस आपली नाहक सतावणूक करत असल्याची तक्रार केली होती, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
वासंती गावडे ही युवती शिरशिरे बोरी येथे मावसभाऊ रामनाथ केसू गावडे याच्याकडे राहत होती. वासंतीला हिला खडपाबांध फोंडा येथील राहुल अर्पाटमेंटमधील एका फ्लॅटमध्ये घरकाम मिळाल्याने ती तेथेच राहात होती. १९९५ च्या सुमारास महानंद नाईक हा फोंड्यात रिक्षा चालवण्याचे काम करत होता. यावेळी महानंद आणि वासंती यांची मैत्री झाली. फोंड्यात आपल्या वडिलांचे हॉटेल, दोन - तीन दुकाने आहेत, असे महानंदने वासंतीला सांगून तिला आपल्या सापळ्यात अडकवले. त्यानंतर १० सप्टेंबर ९५ रोजी महानंदने वासंती हिला बॅंकेचे पासबुक घेऊन येण्याची सूचना केली. आपले वडील पन्नास हजार रुपये देणार आहेत. ते पैसे बॅंकेत तुझ्या खात्यावर जमा करू, असेही सांगितले. तसेच आपले वडील तुला पाहणार असल्याने अंगावर दागिने वगैरे घालून येण्याची सूचना त्याने केली.
त्यानंतर वासंती शिरशिरे येथे मावस भावाकडे गेली. कारण त्याच्याकडे तिचे पासबुक होते. ११ सप्टेंबर ९५ रोजी सकाळी बॅंक पासबुक आणि दागिने घालून फोंड्यात आली. यावेळी तिचा मावस भाऊ सुद्धा तिच्यासोबत आला. वासंती ही दादा वैद्य चौकात थांबली आणि मावसभावाला बॅंकेकडे थांबण्याची सूचना करण्यात आली. त्यानंतर महानंद आपल्या रिक्षातून वासंती हिला घेऊन शांतीनगरच्या दिशेने गेला. त्यावेळी शांतीनगर भागात घनदाट जंगल होते. त्यानंतर वासंती कुणाच्याही दृष्टीस पडली नाही. तिचा मावस भाऊ त्या दिवशी बॅंकेजवळ थांबून शेवटी कंटाळून घरी निघून गेला. दुसऱ्या दिवशी १२ सप्टेंबर ९५ रोजी फोंडा बसस्टॅण्डवर येऊन महानंदची चौकशी केली. मात्र, तो सापडू शकला नाही. त्यानंतर १३ सप्टेंबर ९५ रोजी वासंती गावडे बेपत्ता झाल्याची तक्रार फोंडा पोलिस स्थानकावर दाखल केली. पोलिसांनी वासंती बेपत्ता प्रकरणी चौकशीसाठी महानंद याला बोलावले आणि त्याला संशयित म्हणून सीआरपीच्या ४१ कलमाखाली अटक केली. मात्र, त्याच्याकडून काहीच माहिती न मिळाल्याने त्याला सोडून देण्यात आले. यानंतर श्री. गावडे यांनी बॅंकेकडे वासंती गावडे बेपत्ता असल्याची तक्रार केली, तिच्या खात्यातील रकमेचा व्यवहार कुणाशीही करू नये, अशी मागणी केली. फोंड्यातील दोन युवतींचे खून आणि एका युवतीवरील बलात्कार प्रकरणाची माहिती वृत्तपत्रांतून समजल्यानंतर आपल्या मावसबहिणीलाही याच प्रकारे पळवून नेऊन मारले असावे, असा संशय मनात निर्माण झाला. रामनाथ गावडे याने २ मे ०९ रोजी फोंडा पोलिसांशी संपर्क साधून १९९५ सालातील बेपत्ता प्रकरणाची माहिती दिली. पोलिसांनी १९९५ सालातील जुनी फाईल पुन्हा उघडून तपासाला सुरूवात केली असून अद्याप संशयित महानंद याने या प्रकरणाची कबुली दिलेली नाही. मात्र, वासंतीला पळवून नेल्याचे पुरावे हाती लागल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. या प्रकरणी निरीक्षक सी. एल. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन पन्हाळकर तपास करत आहेत.
महानंदची नार्को चाचणी
फोंड्यातील युवतींच्या खून आणि बलात्कार प्रकरणात गुंतलेला संशयित महानंद आर. नाईक याची नार्को चाचणी केली जाणार आहे, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. महानंद पोलिसांना देत असलेल्या माहितीची पडताळणी केली जात असून याप्रकरणी कसून चौकशी करण्याची मागणी लोकांकडून केली जात आहे.
... आणि महानंदला सोडले
१९९५ साली वासंती गावडेही युवती बेपत्ता झाल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर महानंद याला अटक करून त्याची चौकशी करण्यात आली होती. तथापि, त्याच्याकडून बेपत्ता युवतीसंबंधी कोणतीही माहिती मिळाली नाही. उलट, संशयित महानंद नाईकने फोंडा पोलिस स्थानकावर रिक्षा चालकांचा मोर्चा आणून पोलिस आपली सतावणूक करत आहेत, अशी तक्रार केली. बेपत्ता वासंती गावडे हिचा मावसभाऊ रामनाथ गावडे याने येथील उपजिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. मात्र, बेपत्ता वासंतीचा शोध लागलाच नाही.
Sunday, 3 May 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment