पणजी, दि. ३ (प्रतिनिधी) - कांपाल ते पणजीच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या होंडा सिटी वाहनाने काल मध्यरात्री १ च्या दरम्यान "धेंपो हाऊस'समोरील झाडाला जोरदार दिल्याने वाहन चालक सिल्वीन फर्नांडिस (वय ३२, राहणार परतोवाडो शिवोली) व एल्टन फर्नांडिस (वय १८, राहणार माडेल थिवी) मरण पावले; तर मागच्या सीटवर बसलेला इब्राहिम मिनेझीस (२१) याचे केवळ जखमेवर निभावले. ही धडक एवढी जबरदस्त होती की, वाहनाचा पत्रा कापून अडकलेले सिल्वीन व एल्टन यांना बाहेर काढावे लागले. इस्पितळात नेताना सिल्वीनचे वाटेत निधन झाले तर, एल्टन याचा मृत्यू "गोमेकॉ'त उपचार सुरू असताना झाल्याची माहिती पणजी पोलिसांनी दिली.
काल रात्री जीए ०३ सी ७००० क्रमांकाची होंडा सिटी मोटार घेऊन तिघे मित्र दोना पावला येथे पार्टीला गेले होते. रात्री एकच्या दरम्यान पार्टी संपवून घरी जात असताना हा अपघात झाला. ताशी शंभरच्या किमीच्या वेगाने पणजीच्या दिशेने येणाऱ्या या वाहनावरील चालकाचा ताबा पणजी बाजारात सुटल्याने रस्त्याच्या कडेलाच असलेल्या झाडाला वाहनाने धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच १.१५ वाजता जखमींना वाहनातून बाहेर काढण्यात आले. वाहन चालक सिल्वीन व बाजूच्या सीटवर बसलेला एल्टन याच्या डोक्याला आणि छातीला जबर मार बसल्याने उपचाराला कोणताही प्रतिसाद न देता मृत्यू झाला. सिल्वीनचा काही महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. त्याचा आनंद साजरा करण्यासाठी तिघे मित्र पार्टीला गेल्याची माहिती पोलिसांनी दिली. या वाहनाच्या मागच्या सीटवर बीअरच्या बाटल्याही आढळल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी पंचनामा करून वाहन ताब्यात घेतले आहे. अपघातात सापडलेली होंडा सिटी पोलिस स्थानकाच्या बाहेर ठेवण्यात आली आहे. ती पाहण्यासाठी आज दिवसभर तेथे मोठी गर्दी झाली होती. याप्रकरणी पणजी पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक रत्नाकर कळंगुटकर तपास करत आहेत.
Monday, 4 May 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment