खलपांच्या फेरप्रवेशावरून वाद
बेशिस्तीला थारा नाही - राऊत
पणजी, दि. २ (प्रतिनिधी)- माजी केंद्रीय कायदा राज्यमंत्री ऍड. रमाकांत खलप यांना महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षात फेरप्रवेश देण्यावरून आता पक्षाच्या केंद्रीय समितीत सरळ फूट पडली आहे. या प्रश्नावरून सुदिन व दीपक या ढवळीकर बंधूंच्या समर्थकांनी केंद्रीय समितीच्या आजच्या नियोजित बैठकीत धुडगूस घालण्याची जय्यत तयारी केली होती. तथापि, ही बैठकच रद्द झाल्याने त्यांच्या पदरी निराशाच पडली. मगोचा त्याग करून गेलेल्या माजी नेत्यांना कोणत्याही स्थितीत पक्षात फेरप्रवेश देणार नाही, असा निर्धार आमदार दीपक ढवळीकर व त्यांच्या समर्थकांनी केला. दरम्यान, पक्षाध्यक्ष पांडुरंग राऊत यांनी या प्रकाराचा कडक शब्दांत समाचार घेतला आहे. ढवळीकर बंधूंनी तात्काळ ही बेशिस्त थांबवावी व पक्षांतर्गत वातावरण गढूळ बनवू नये, असा सल्ला त्यांनी दिला.
मगो हा बहुजन समाजाचे व्यासपीठ असल्याने बहुजन समाजातील नेत्यांना पक्षात प्रवेश नाकारणे योग्य नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले.
मगो पक्षात सध्या विधिमंडळ गट व केंद्रीय समिती यांच्यात वाद निर्माण झाला आहे. पक्षाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी पक्षाचे सर्व माजी नेते, त्यांचे समर्थक तथा कुटुंबीय यांना पक्षात फेरप्रवेश करण्याचे आवाहन करण्यात आले होते. केंद्रीय समितीच्या या निर्णयाचे स्वागत करून विविध ठिकाणी माजी नेत्यांना पक्षात पुन्हा आमंत्रण देण्याचे काम जोमात सुरू झाले. उत्तर गोवा युवा अध्यक्ष राघोबा गावडे तसेच जिल्हा पंचायत सदस्य श्रीधर मांद्रेकर आदी नेत्यांनी माजी केंद्रीय कायदा राज्यमंत्री ऍड. रमाकांत खलप यांना पक्षात फेरप्रवेश देण्याचा प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावाला पेडणे मतदारसंघातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याने इतरही ठिकाणी त्याचे पडसाद उमटले. खलप यांच्यासह इतरही ज्येष्ठ नेत्यांची नावे चर्चेत आल्याने एकच खळबळ उडाली. वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर व आमदार दीपक ढवळीकर यांनी मात्र या प्रस्तावाला विरोध करून या नेत्यांना कोणत्याही परिस्थितीत पक्षात जागा दिली जाणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.
आज मगो मुख्यालयात दीपक ढवळीकर यांच्यासह केंद्रीय समितीचे पाच सदस्य हजर होते, असा दावा त्यांनी केला आहे. या सदस्यांत प्रदीप घाडी आमोणकर, नरेश गावडे, प्रताप फडते, लवू मामलेदार, कृष्णनाथ दिवकर यांचा समावेश होता. एकूण १५ सदस्यांपैकी सहा सदस्यांनी आज उपस्थिती लावली. दरम्यान, ढवळीकरबंधूंनी कोणत्याही पद्धतीने हा डाव मोडून काढण्यासाठी प्रयत्नांची शर्थ सुरू केली आहे. मगो युवाशक्ती या नावाने ढवळीकर समर्थक युवा नेत्यांनी पत्रकार परिषद आयोजित करून केंद्रीय समितीच्या या निर्णयाला तीव्र हरकत घेतली आहे. १९९७ ते २००९ पर्यंत ढवळीकर बंधूंनी हा पक्ष एकहाती सांभाळला व त्यास संजीवनी मिळवून दिली. आता अन्य पक्षात आपली डाळ शिजत नसल्याने पुन्हा मगोत प्रवेश करून आपली राजकीय कारकीर्द घडवण्याच्या तयारीत असलेल्या या नेत्यांना अजिबात प्रवेश दिला जाणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे. दक्षिण गोव्यातीलही विविध कार्यकर्त्यांकडून या निर्णयाला विरोध करणारी पत्रके प्रसिद्ध होत असल्याने या विषयावरून येत्या दिवसांत बराच गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे.
हा वाद निरर्थक ः राघोबा गावडे
ऍड. रमाकांत खलप यांना मगो पक्षात फेरप्रवेश देण्याचा प्रस्ताव हा केंद्रीय समितीने घेतलेल्या निर्णयानुसारच सादर केला आहे. आता कुणाला प्रवेश द्यावा व कुणाला प्रवेश देऊ नये, याचा अंतिम निर्णय केंद्रीय समितीला घ्यायचा आहे. या विषयावरून विनाकारण वाद निर्माण करण्यात येत असल्याची प्रतिक्रिया उत्तर गोवा युवाध्यक्ष राघोबा गावडे व जिल्हा पंचायत सदस्य श्रीधर मांद्रेकर यांनी व्यक्त केली. मगो पक्ष व्यक्तीकेंद्रीत न राहता बहुजनसमाजहिताय व्हावा ही पक्षाची सुरुवातीपासूनची नीती आहे. या पक्षाची त्या दृष्टीने विस्तार व्हावा असेही ते म्हणाले. खलप यांच्या मगो फेरप्रवेशाबाबतच्या प्रयत्नांना जोर आला असता पक्षातील एक गट याविरोधात उभा ठाकला आहे. विश्वजित राणे चालतील पण खलप नकोत, या विधानास त्यांनी तीव्र हरकत घेतली आहे. विश्वजित राणे हे गोव्याचे मंत्री आहेत की सत्तरीचे हे त्यांनी पहिल्यांदा सांगावे. उर्वरित ठिकाणच्या युवकांना घरी पाठवून सरकारी कर्मचाऱ्यांच्या रुपात केवळ आपल्या सत्तरीतील युवकांचा भरणा करण्याचा सपाटा त्यांनी लावला आहे. नव्या नोकऱ्यांत ९० टक्के केवळ सत्तरीवासीयच आहे तर उर्वरित युवकांनी काय करावे, असा सवालही यावेळी करण्यात आला.
ढवळीकर बंधूंना आकाशवाणी
झाली काय ः पांडुरंग राऊत
मगो पक्षाच्या केंद्रीय समितीने पक्षाच्या उज्ज्वल भवितव्यासाठीच माजी नेत्यांना पक्षात फेरप्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. याप्रकरणी अद्याप एकही नेत्याने पक्षाकडे संपर्क साधला नाही. परंतु, कंसाला ज्याप्रमाणे श्रीकृष्ण जन्माची आकाशवाणी झाली, त्याप्रमाणे आता ढवळीकर बंधूंनाही आकाशवाणी झाली की काय, असा टोला पांडुरंग राऊत यांनी हाणला. त्यांनी काही नेत्यांची यादीच तयार केली असून त्यांना प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात खलप यांच्यासह रवी नाईक, संजय बांदेकर, डॉ. काशीनाथ जल्मी, प्रकाश वेळीप यांचा समावेश आहे. युवाशक्ती या नावाने आपल्या समर्थकांना एकत्र करून काल जो धुडगूस घालण्यात आला त्याची गंभीर दखल केंद्रीय समितीने घेतली आहे, असेही राऊत म्हणाले. पक्षातील अशी बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही. या युवाशक्तीने जो धिंगाणा घातला त्याबाबत चर्चा करण्यात आली असून त्यामुळेच केंद्रीय समितीची बैठक रद्द करण्यात आल्याचे राऊत म्हणाले.
Sunday, 3 May 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment