Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 8 May 2009

८५ मतदारसंघांत ५७ टक्के मतदान

नवी दिल्ली, दि. ७ : पंधराव्या लोकसभेसाठी चौथ्या टप्प्यात आज आठ राज्यांमधील ८५ मतदार संघांत झालेल्या निवडणुकीत एकूण सरासरी ५७ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. तिसऱ्या टप्प्याप्रमाणेच पुन्हा एकदा पश्चिम बंगालमध्ये चौथ्या टप्प्यातही सर्वाधिक ७५ टक्के मतदान झाले आहे. तिसऱ्या टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये ८० टक्के मतदान झाले होते. हुरियतने निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यासाठी केलेले ५० तास बंदचे आवाहन झुगारून जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर लोकसभा मतदार संघात आज २४ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. पश्चिम बंगालमधील हिंसाचाराची घटना वगळता देशातील उर्वरित भागात मतदान सुरळीत पार पडले.
दुपारी ५ वाजता मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राजधानी नवी दिल्ली येथे सायंकाळी आयोजित एका पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त बी. आर. शर्मा यांनी आज झालेल्या मतदानाची टक्केवारी जाहीर केली. पश्चिम बंगालमध्ये आज १७ मतदार संघांत मतदान झाले. राज्यातील जांगीपूर मतदार संघात झालेल्या हिंसाचारात एकाला आपले प्राण गमवावे लागले. या मतदार संघातून कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रणव मुखर्जी उभे आहेत. पश्चिम बंगालखालोखाल ६५ टक्के मतदान पंजाबमधील चार मतदार संघात झाले. आज राजस्थानमधील २५, हरयाणामधील १० आणि दिल्लीतील ७ या सर्वच्या सर्व मतदार संघांत मतदान होऊन तेथे अनुक्रमे ५०, ६३ व ५० टक्के मतदानाची नोंद झाली. बिहारमध्ये आधीच्या तीन टप्प्यांप्रमाणेच चौथ्या टप्प्यातही अपेक्षेपेक्षा कमी मतदान झाले. सायंकाळी निवडणुकीची प्रक्रिया संपल्यानंतर बिहारमध्ये अवघ्या ३७ टक्के मतदानाची नोंद झाली.
पंधराव्या लोकसभेची निवडणूक पाच टप्प्यात आयोजित करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला असून सुरक्षेच्या दृष्टीने उत्तर प्रदेशात या पाचही टप्प्यात मतदान घेतले जात आहे. देशातील मोठ्या व राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण असणाऱ्या उत्तर प्रदेश राज्यात आज १८ मतदार संघांत झालेल्या मतदानाची टक्के ५० टक्के होती.
चौथ्या टप्प्याच्या मतदानानंतर लोकसभेतील ५४३ जागांपैकी ४५७ जागांवरील मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली असून उर्वरित ८६ जागांचे मतदान पाचव्या व अंतिम टप्प्यात बुधवार १३ मे रोजी होणार आहे. या संपूर्ण जागांची मतमोजणी मात्र एकाच दिवशी म्हणजे १६ मे रोजी होणार आहे .
भाजपाचे राजनाथसिंग, राजदचे लालूप्रसाद यादव, सपाचे मुलायमसिंग या तिन्ही आपापल्या पक्षांच्या राष्ट्रीय अध्यक्षांप्रमाणेच, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रणव मुखर्जी यांच्यासह १३१५ उमेदवारांचे भाग्य आज मशीन बंद झाले. यात ११९ महिला उमेदवारांचाही समावेश होता.

No comments: