खंडपीठाचा पोलिसांना आदेश
पणजी, दि. ६ (प्रतिनिधी) - ऍड. आयरिश रॉड्रिगीस यांना दिलेल्या कथित धमकी प्रकरणात राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले जाणार असल्याचे आज जुने गोवे पोलिसांनी न्यायालयाला सांगताच, त्या आरोपपत्राची एक प्रत ८ मे रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात सादर करण्याचे आदेश न्या. रोशन दळवी यांनी आज दिले. आरोपपत्र दाखल करण्याचे आश्वासन देऊनही त्याची कार्यवाही न केल्यामुळे पोलिस निरीक्षक गुरुदास गावडे यांच्याविरोधात अवमान याचिकेवर सुरू असलेल्या सुनावणीच्या वेळी हा आदेश देण्यात आला.
माजी क्रीडामंत्री दयानंद नार्वेकर यांच्यानंतर आरोपपत्र दाखल होणारे कॉंग्रेस मंत्रिमंळातील विश्वजित राणे हे दुसरे मंत्री ठरणार आहेत. आरोपपत्र दाखल झाल्यानंतर विश्वजित यांचे मंत्रिपद जाणार काय, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. सर्वोच्च न्यायालयानेही याची गंभीर दखल घेऊन गेल्या महिन्यात राज्य सरकारला "कारणे दाखवा' नोटीस बजावली होती.
२३ सप्टेंबर २००८ रोजी विश्वजित यांच्यावर आरोपपत्र दाखल केले जाणार असल्याचे सरकारी वकील विनी कुतिन्हो यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला सांगितले होते. त्यावेळी या प्रकरणाचे तपास अधिकारी गुरुदास गावडे न्यायालयात उपस्थित होते. त्यानंतर मात्र प्रत्यक्षात आरोपपत्र दाखल न करता थेट या प्रकरणाची चौकशीच थांबवून फाईल बंद करण्यात आल्याने निरीक्षक गावडे यांच्याविरोधात न्यायालयाचा अवमान केल्याची याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावेळी चौकशीची फाईल प्रॉसिक्युशन संचालकांच्या सुचनेनुसार तपासाची फाईल बंद करण्यात आल्याचे गावडे यांनी न्यायालयाला सांगितले होते.
न्यायालयाला या धमकी प्रकरणात तथ्य असल्याचे आढळून आल्यानंतर आरोग्यमंत्र्यांच्या विरोधात
आरोपपत्र दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.
Thursday, 7 May 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment