Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 9 May 2009

अंजनी व सुनिताचा खुनीही महानंदच!

बेतकीच्या निर्मला घाडीप्रकरणातही तोच?
कबुली दिलेली प्रकरणे ७
संशय आणखी ५ प्रकरणांचा!

फोंडा, दि.८ (प्रतिनिधी) : गवळ निरंकाल येथील कु. अंजनी अनंत गांवकर (२८) आणि बेतोडा येथील कु. सुनिता गांवकर (३०) याचा खून केल्याची कबुली युवतींच्या खून प्रकरणी अटक केलेल्या महानंद रामनाथ नाईक याने फोंडा पोलिसांना दिली असून संशयित महानंद नाईक याने आत्तापर्यंत सात युवतींच्या खुनांची कबुली दिली आहे. बेतकी येथील कु.निर्मला वसंत घाडी (३०) या युवतींच्या बेपत्ता प्रकरणी महानंद नाईक गुंतल्याचे नवीन प्रकरण फोंडा पोलिसांकडे आज (दि.८) नोंद झाले आहे. बेपत्ता असलेली निर्मला हिची आई श्रीमती प्रभावती वसंत घाडी हिने यासंबंधी तक्रार दाखल केली आहे. संशयित महानंद नाईक आणखी पाच प्रकरणामध्ये संशयाच्या घेऱ्यात आहे. त्यात गुलाबी गांवकर, दीपाली ज्योतकर, कु. सूरत व इतर प्रकरणांचा समावेश आहे.
कु.योगिता नाईक (कुर्टी), कु. दर्शना नाईक (तरवळे), वासंती गावडे (मडकई), केसर नाईक (पंचवाडी), नयन गावकर (पंचवाडी) यांच्या खुनाची कबुली यापूर्वी दिलेली आहे.
बेतोडा येथील कु.सुनिता गावकर ही युवती गावातील दूध सोसायटीमध्ये दूध आणून घालण्याचे काम करीत होती. त्यांच्या कुटुंबाची गुरे असल्याने काही वेळा गुरांचे खाद्य आणण्यासाठी फोंड्याला ये-जा करीत होती. फोंडा भागात महानंद नाईक याचा वावर होता. त्यामुळे काहीवेळा तो बेतोडा येथे सुध्दा जात होता. यावेळी महानंद याने कु. सुनिता हिच्याशी मैत्री केली. आपण खांडेपार येथील रहिवासी आहे. तसेच एका चांगल्या कंपनीत कामाला आहे, असे सुनिता हिला सांगितले होते. आपल्या आई वडिलांना तुला पाहण्यासाठी घरी बोलाविले आहे. आपल्या घरी येताना अंगावर दागिने वगैरे घालून येण्याची सूचना महानंद नाईक याने केली. सुनिता हिने ही गोष्ट घरच्याना सांगितले. त्यावेळी मित्राला घरी घेऊन येण्याची सूचना करण्यात आली. सुरुवातीला तू आपल्या घरी ये त्यानंतर आपण तुमच्या घरी येतो, असे महानंद नाईकने सांगितले. सुनिता घरातून दागिने सोबत घेऊन गेली होती. महानंद हा कु. सुनिता हिला खांडेपार येथील डोंगराळ भागात घेऊन गेला, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. कु. सुनिता बेपत्ता झाल्यानंतर घरच्यानी खांडेपार भागात चौकशी केली. त्यावेळी सुनिताचा थांगपत्ता लागू शकला नाही. सुनिताला दिलेली माहिती चुकीची असल्याचे घरच्यांना कळून चुकले.
गवळ निरंकाल येथील अंजनी गांवकर ही युवती फोंडा येथे कामाला होती. याच ठिकाणी महानंद याचा वावर होता. अंजनी हिच्या घरची आर्थिक परिस्थिती नाजूक होती. त्यामुळे दहावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर काम करण्यास सुरुवात केली. अंजनी हिच्या लग्नासाठी तिच्या कुटुंबीयांनी काबाड कष्ट करून पैसे जमवून दागिने तयार केले होते. महानंदने अंजनी हिच्याशी मैत्री करून तिला आपल्या जाळ्यात ओढले. अंजनी हिने घरातून जाताना पन्नास ते साठ हजार रुपयांचे दागिने आपल्या सोबत नेले होते. तिला सुध्दा ओपा खांडेपार येथील जंगलात नेऊन ठार केले, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.
बेतकी येथील कु.निर्मला घाडी ही युवती २००७ सालापासून बेपत्ता आहे. ती माशेल येथे कामाला होती. संशयित महानंद नाईक याने वरचा बाजार फोंडा येथे निर्मला हिच्याशी पहिल्यांदा ओळख केली. यावेळी निर्मला हिच्या ओळखीच्या काही जणांची नावे घेऊन तिच्याशी बोलण्यास प्रारंभ केला. महानंद हा बोलण्यास हुशार होता. गोड बोलून दुसऱ्याला आपल्याकडे आकर्षित करून घेत होता. आपली म्हार्दोळ येथे लहान कारखाना आहे, असे निर्मला हिला सांगितले. त्यानंतर त्याच्यात मैत्री झाली. त्या युवकाने आपल्याला घरच्या लोकांना दाखविण्यासाठी घरी बोलाविले आहे. आपल्या घरी येताना चांगली नटून थटून येण्याची सूचना केली. त्यामुळे निर्मला हिने आपल्या बहिणीच्या घरी ठेवलेले दागिने घेऊन आली आणि त्यांच्यासोबत गेली. त्यानंतर ती परत घरी आली नाही. कु. निर्मला हिच्या आई सौ.प्रभावती घाडी हिने संशयित महानंद नाईक याला ओळखले आहे, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.
आत्मविश्र्वास कमी असलेल्या, भोळ्या युवतींना हेरून त्यांना आपल्या जाळ्यात ओढण्याचे काम करीत होता. संशयित महानंद नाईक हा युवतींना आपल्याबाबत खोटी माहिती देत होता. श्रीमंत असल्याचा बहाणा करीत होता आणि मुलींना लग्नाचे आमिष दाखवून त्यांना घरातून येताना दागिने घेऊन येण्याची सूचना करीत होता. आत्तापर्यंत खून करण्यात आलेल्या सर्वच युवती घरातून दागिने घेऊन गेलेल्या आहेत. महानंद नाईक हा शांतपणे युवतीचे खून करून समाजात वावरत होता. संशयित सांगत असलेल्या गोष्टी ऐकून अंगावर काटा येतो. युवतींची निर्दयपणे हत्या करीत होता, असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.
संशयित महानंद नाईक याची पत्नी सौ. पूजा नाईक हिची पोलिसांनी अद्याप जबानी नोंदवून घेतलेली नाही. सौ. पूजा नाईक या मुलींच्या खूनप्रकरणी आपणाला काहीच माहिती नसल्याचे सांगून लोकांकडून सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. पूजा नाईक ही एक कलाकार असल्याने लोकांची सहानुभूती कशी मिळवियाची ही कला तिला चांगलीच अवगत आहे, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. उपअधीक्षक शेराफीन डायस यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सी.एल. पाटील, उपनिरीक्षक संजय दळवी, उपनिरीक्षक तुकाराम चव्हाण, उपनिरीक्षक निखील पालेकर, उपनिरीक्षक लक्षी आमोणकर, हेडकॉस्टेबल सोनू परब आदी तपास करीत आहेत.
माझ्या एकुलत्या मुलीचा लग्नाचे खोटे आमिष दाखवून घात करणाऱ्या महानंद नाईक या नराधमाला जिवंत ठेवू नका, अशी प्रतिक्रिया अंजनी गांवकर हिची आई श्रीमती शेवंती अनंत गांवकर हिने व्यक्त केली आहे. शेंवती गावकर हिला पत्रकारांशी बोलताना गहिवरून आले. घरातून सोन्याचे दागिने घेऊन गेलेली माझी मुलगी कुठे तरी सुखी असेल असे वाटत होते. माझ्या भोळ्या भाबड्या मुलीचा नराधमाने फसविले. आम्ही मोठ्या कष्टाने पैसे कमावून मुलीच्या लग्नासाठी गोळा केलेले सोने मुलीचा खून करून चोरून नेणाऱ्याला कडक शिक्षा झाली पाहिजे, असेही तिने सांगितले.
मुलीला फुस लावून पळून नेणाऱ्या महानंद या कसायाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया बेपत्ता असलेल्या कु. निर्मला हिची आई श्रीमती प्रभावती वसंत घाडी यांनी व्यक्त केली. वरचा फोंडा येथे ओळख नसताना सुध्दा महानंद याने मुलीशी बोलण्यास प्रारंभ केला. त्याने दिनेश हे आमच्या ओळखीचे नाव घेतल्याने त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करून मुलींला तिच्याशी बोलण्यास मुभा दिला. त्या संधीचा महानंद याने गैरफायदा घेत माझ्या मुलगीची फसवणूक केली, असेही तिने सांगितले.
"पत्नीचीही चौकशी करा'
शिरोड्याचे आमदार महादेव नाईक यांनी यासंबंधी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, महानंद नाईक याने शिरोडा गावाचे नाव बदनाम केले आहे. याप्रकरणी त्याच्या पत्नीची सुध्दा कसून चौकशी करण्याची गरज आहे. तसेच तिला विविध मनोरंजनाचे कार्यक्रम करण्यासाठी अर्थसाहाय्य करणाऱ्यांची सुध्दा चौकशी करण्याची गरज आहे. तरवळे शिरोडा येथील कु. अंगना शिरोडकर हिच्या खून प्रकरणी पुन्हा तपास करण्याची गरज आहे, असेही आमदार श्री. नाईक यांनी सांगितले.
-----------------------------------------------------------
ही संख्या कितीवर जाणार?
१९९४ पासून संशयित महानंद नाईक याने युवतींचे खून करण्याचे सत्र सुरू केले आहे. अखेरचा खून जानेवारी २००९ मध्ये केला आहे. त्यामुळे चौदा वर्षात महानंद नाईक याने किती युवतींचे खून केले हे कळणे मुश्कील आहे. यासंबंधी प्रकरणे पोलिसांकडे येत आहेत. त्याप्रमाणे तपास काम हाती घेतले जात आहे.
-----------------------------------------------------------------------------
ओपा कोडार जंगलात दोन खून
बेतोडा येथील सुनिता गांवकर ही युवती २००३ सालापासून बेपत्ता आहे. तर अंजनी गांवकर ही युवती २००५ सालापासून बेपत्ता आहे. या दोघांनी घरातून जाताना प्रत्येकी पन्नास ते साठ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आपल्या सोबत नेले होते. सुनिता व अंजनी या दोघांचा ओपा कोडार भागातील जंगलात खून करून मृतदेह त्याच ठिकाणी टाकल्याचे संशयित महानंद नाईक याने पोलिसांना सांगितले असून खून करण्यात आलेली जागा पोलिसांना दाखविली आहे.
-------------------------------------------------------------------------

No comments: