Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 9 May 2009

वरूण गांधींवरील 'रासुका' हटवला

आढावा समितीचा निर्णय
लखनौ, दि. ८ : भाजपचे नेते वरूण गांधी यांच्यावर उत्तर प्रदेश सरकारने लावलेला राष्ट्रीय सुरक्षा कायदा ( रासुका) हटविण्यात आला आहे. पिलिभित येथे प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी वरूण गांधी यांच्यावर मायावती सरकारने २८ मार्च रोजी रासुका लावला होता, यासंबंधी दोन न्यायमूर्तींचा समावेश असलेल्या आढावा समितीने ही कारवाई आज अवैध ठरविल्याने मुख्यमंत्री मायावती यांना हा जबरदस्त दणका मानला जात आहे.
सध्या वरूण गांधी पेरॉलवर मुक्त आहेत. वरूण गांधी यांना रासुका लावल्यानंतर २९ मार्च रोजी अटक कऱण्यात आली होती. वरूण गांधी यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत पिलिभित जेलच्या बाहेर गोंधळ घातला होता. वरूण गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन रासुकाविरोधात याचिका दाखल केल्यानंतर १६ एप्रिल रोजी त्यांची पॅरोलवर सुटका करण्यात आली होती. प्रथम त्यांना १ मे पर्यंत आणि नंतर १४ मे पर्यंत पॅरोल मंजूर करण्यात आला होता. आता राज्यस्तरीय आढावा समितीने वरुण गांधी यांना रासुका लावणे बेकायदा ठरविले आहे. त्यापूर्वी या समितीने वरुण तसेच न्यायदंडाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले होते. या समितीत न्या. प्रदीप कांत व पी.के.सरीन या वरिष्ठ न्यायमूर्तींचा समावेश आहे.

No comments: