मडगाव, दि. १ (प्रतिनिधी)
रशियन युवतीवरील बलात्कार प्रकरणी गेले एक वर्ष व तीन महिने कोठडीत असलेला कोलवा येथील राजकारणी जॉन फर्नांडिस याचा जामीन अर्ज येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश विजया पोळ यांनी आज मंजूर केला. त्यामुळे त्यांची प्रदीर्घ कालावधीनंतर सुटका होण्याचा मार्ग मोकळा झाला.
पन्नास हजारांचा व्यक्तिगत जामीन व तेवढ्याच रकमेच्या दोन हमी घेऊन त्यांना मुक्त करावे तसेच त्यांनी आपला पासपोर्ट पोलिसांत सादर करावा व गोव्याबाहेर जावयाचे झाल्यास न्यायालयाकडून पूर्व परवानगी घ्यावी असा आदेश देताना न्यायाधीशांनी वस्तुस्थितीत झालेल्या बदलावर बोट ठेवले आहे. या प्रकरणातील पूर्ण झालेला तपास, त्यामुळे साक्षीदारांवर त्याने दडपण आणण्याचा प्रश्न उद्भवत नसल्याचे म्हटले आहे.
अर्जदार ही एक जबाबदार व्यक्ती आहे व त्याने यापूर्वी निवडणूकही लढविलेली असल्याने तो पळून जाण्याची कोणतीच शक्यता नाही याकडेही निवाड्यात लक्ष वेधले आहे व सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निवाड्याकडे अंगुलिनिर्देश केला आहे.
गेल्या बुधवारी या अर्जावरील युक्तिवाद पूर्ण झाल्यावर न्यायाधीशांनी आज निवाडा देण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे सर्वांचे निवाड्याकडे लक्ष खिळून होते.
जॉनला या बलात्कार प्रकरणात जानेवारी २००९ मध्ये अटक झाली होती. त्यानंतर जामिनासाठी त्याने वेगवेगळे आठ अर्ज सादर केले. त्यांतील दोन हायकोर्टात तर दोन सुप्रीम कोर्टात होते.
बलात्काराची ही घटना २ डिसेंबर २००९ मध्ये घडली होती व त्यानंतर जानेवारी २०१० पासून जॉन कोठडीत आहे. अतिरिक्त सत्र न्यायालयात जॉन ची बाजू ऍड. शशांक सामंत यांनी तर सरकारची बाजू ऍड. भानुदास गावकर यांनी सांभाळली.
Saturday, 2 April 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment