Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday, 29 March 2011

..तर खाणी बंद पाडू!

आलेक्स सिक्वेरा यांचे आश्‍वासन

पणजी, दि. २८ (प्रतिनिधी)
राज्यात खनिज उद्योगाचा परवाना मिळालेल्या १०५ खाणींचे पर्यावरणीय परिणाम अहवाल (इआयए) नव्याने तपासले जातील. गोवा पर्यावरणीय अभ्यास केंद्राव्दारे हे काम हाती घेण्यात येणार असून ज्येष्ठ पर्यावरणीय तज्ज्ञ माधव गाडगीळ यांची यासाठी मदत घेतली जाईल. या अभ्यासात जर कोणत्याही खाण कंपनीकडून बनावट दाखला सादर झाल्याचे किंवा पर्यावरणीय अटींचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आले तर त्या खाणी बंद पाडण्यास अजिबात मागेपुढे पाहणार नाही, असे ठोस आश्‍वासन पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी दिले.
आज विधानसभेत पर्यावरण, वीज, विज्ञान, पर्यावरण व तंत्रज्ञान आदी खात्यांच्या मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. खाण उद्योगामुळे पर्यावरणाचा र्‍हास टाळण्यासाठी यापुढे खनिज उत्खननावर निर्बंध लादण्याच्या मागणीला त्यांनी आपली पूर्ण संमती दर्शवली. यापुढे कायदेशीर परवाने मिळवूनही नव्या खाणी सुरू करण्यास परवानगी देण्यात येऊ नये, असेही ते म्हणाले.
राज्याला ३७ मेगावॉटचा अतिरिक्त वीजपुरवठा मंजूर झाला आहे व त्यामुळे काही काळापासून स्थगित ठेवलेल्या औद्योगिक वीज जोडण्यांचा विषय निकालात काढण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. वीजपुरवठ्याबाबत पायाभूत सुविधा उभारण्यासाठी ३१३.७८ कोटी रुपयांची विविध कामे मंजूर केली आहेत. २०१०-११ या काळात ९५७ कोटी रुपयांचा महसूल वीज खात्याने मिळवला आहे व थकबाकी वसुलीसाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. विविध ठिकाणी मोबाईल व्हॅन सेवा वाढवण्याचाही खात्याचा प्रस्ताव असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
घन कचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने बिगर सरकारी संस्थांच्या सहकार्याने देखरेख समिती स्थापन केली आहे. याव्दारे ग्रामीण व शहरी स्तरावर जागृती मोहीम राबवून स्वच्छतेसाठी विविध पंचायतींतर्फे विविध पुरस्कारांची योजनाही आखण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

No comments: