Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday, 29 March 2011

राज ठाकरेंच्या सुरक्षारक्षकाकडून बोरीत टेम्पोचालकाला मारहाण?

फोंडा, दि. २८ (प्रतिनिधी)
बोरी सर्कल येथे आज (दि. २८) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाहन ताफ्यातील सुरक्षारक्षकाने रेतीवाहू टेम्पोचा (क्र. जीए ०८ व्ही ६४२३) चालक दयानंद सतरकर याला मारहाण करून त्यानंतर त्याला पिस्तुलाचा धाक दाखविल्याच्या कथित घटनेनंतर बोरी गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. या घटनेमुळे संतप्त बनलेल्या स्थानिकांनी सुमारे दोन - अडीच तास रास्ता रोको आंदोलन करून टेम्पो चालकाला मारहाण करणार्‍या त्या सुरक्षारक्षकावर कारवाई करण्याची मागणी केली.
यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे अंत्रुज महालात देवदर्शनासाठी आले होते. दुपारी मडगावच्या दिशेने त्यांच्या वाहनांचा ताफा बोरी मार्गे जात असताना बोरी सर्कल येथील चढणीवर एका रेतीवाहू टेम्पोने रस्त्यात अडथळा निर्माण केल्याने राज ठाकरे यांच्या सुरक्षारक्षकाने टेम्पोच्या चालकाशी हुज्जत घालून त्याला मारहाण केली. तसेच वाहनाचे नुकसान केल्याची टेम्पोचालक दयानंद सतरकर यांची तक्रार आहे. या घटनेनंतर राज ठाकरे यांच्या वाहनाचा मडगावच्या दिशेने जाणारा ताफा अचानक परत फोंड्याच्या दिशेने वळविण्यात आला. दरम्यान, टेम्पोचालकाने आपल्या मोबाईलवरून टेम्पोचे मालक रूपेश बोरकर यांच्याशी संपर्क साधून घडलेल्या घटनेची माहिती दिली. राज ठाकरे यांची गाडी फोंड्याच्या दिशेने जात असल्याचे सांगण्यात आल्याने टेम्पोच्या मालकाने आपल्या वाहनाने सदर वाहनाचा पाठलाग करून ढवळी - फर्मागुडी बगलमार्गावरील बांदोडा येथे हॉटेल व्यंकटेश लीलाजवळ राज ठाकरे यांच्या वाहनांचा ताफा अडविला. यावेळी सुरक्षा रक्षकाने टेम्पोचे मालक रूपेश बोरकर यांनाही मारहाण केली आणि पिस्तुलाचा धाक दाखवून रस्ता मोकळा करून वाहनांचा ताफा घेऊन पणजीच्या दिशेने रवाना झाला.
या घटनेमुळे बोरी गावात एकच खळबळ माजली. अफवांना मोठ्या प्रमाणात पीक आले. संतप्त लोकांनी बोरी सर्कल व इतर ठिकाणी रस्त्यावर दगड ठेवून रस्ता वाहतुकीसाठी बंद केला. ह्या प्रकाराची माहिती मिळताच फोंडा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, त्या ठिकाणी संतप्त लोकांची संख्या जास्त असल्याने पोलिसांना बघ्याची भूमिका निभावावी लागली. पोलिसांची कुमक कमी असल्याने उपअधीक्षक सेराफीन डायस, पोलिस निरीक्षक सी. एल. पाटील यांनी त्वरित बोरी गावात धाव घेऊन लोकांशी चर्चा करून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. दोन - अडीच तास वाहतुकीचा खोळंबा झाल्याने लोकांना बराच त्रास सहन करावा लागला. या प्रकरणी टेम्पोचा चालक दयानंद सतरकर याने फोंडा पोलिस स्टेशनवर अज्ञात सुरक्षारक्षकाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत कुठल्याही राजकारणी किंवा नेत्याच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. मात्र, फोंडा पोलिसांनी रस्ता अडविल्याप्रकरणी दयानंद सतरकर व इतरांच्या विरोधात तक्रार नोंद केली आहे.
दरम्यान, पिस्तुलातून गोळीबार केल्याच्या वृत्ताचा पोलिसांनी इन्कार केला आहे. मारहाण करण्यात आलेल्या दयानंद सतरकर याची येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्यांना साधी दुखापत झाल्याचे वैद्यकीय अहवालात म्हटले आहे. याप्रकरणी उपअधीक्षक सेराफीन डायस यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सी. एल. पाटील तपास करीत आहेत.

No comments: