पणजी, दि. २६ (प्रतिनिधी)
प्राथमिक शिक्षण इंग्रजी भाषेतून घेणारेच जगात ज्ञानीम्हणून मिरवतात, इंग्रजी शिकणार्यांनाच नोकर्या मिळतात, जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी इंग्रजीला पर्याय नाही, असे अर्थहीन विचार सर्वसामान्य पालकांच्या मनात भरून त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. इंग्रजीचे समर्थन करणार्यांनी जगात फक्त १० टक्के मुलेच प्राथमिक शिक्षण इंग्रजी भाषेतून घेतात या वस्तुस्थितीची जाणीव ठेवावी व पालकांची दिशाभूल करणे बंद करावे, असे आवाहन शिक्षणतज्ज्ञ प्रा. माधवराव कामत यांनी केले आहे.
गोव्यात काही स्वार्थी अराजकीय शक्तींनी प्राथमिक शिक्षणाचा विषय उरकून काढला आहे. येथील स्थानिक भाषांना डावलून प्राथमिक शिक्षणाचे माध्यम इंग्रजी करण्याची मागणी त्यांनी सुरू केली असून त्यानुसार मोहीम आखली आहे. या मोहिमेविरुद्ध ‘भारतीय भाषा रक्षण मंच गोवा’ने दंड थोपटले आहेत. याबाबत बोलताना प्रा. कामत यांनी इंग्रजी समर्थकांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, गोव्यात प्राथमिक स्तरावर इंग्रजीचे माध्यम सुरू केले तर गावागावांतील मराठी व कोकणी शाळा बंद पडतील आणि तेथे इंग्रजी शाळा सुरू होतील. हळूहळू मराठी व कोकणी भाषेचे गोव्यातून उच्चाटन होऊन त्या इतिहासजमा होतील अशी भिती प्रा. कामत यांनी व्यक्त केली.
स्थानिक भाषा हीच गोव्याची ओळख असून संस्कृती व परंपरांचे जतन याच भाषांतून होत असते. देशी तथा स्थानिक भाषा राष्ट्रप्रेम, राष्ट्रवादाचे माध्यम आहेत. देशी भाषांपासून दुरावलेले विद्यार्थी भारतीय संस्कृती तसेच भारतीयत्वापासून दुरावण्याची शक्यता आहे. देशी भाषांतून प्राथमिक शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांची आकलन शक्ती चांगली असते व पुढील काळात त्यांना ज्ञान संपादन करण्यास सोईचे ठरते हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे असे प्रा. कामत म्हणाले.
जगातील बहुतांश सर्वच देशांमध्ये तेथील स्थानिक भाषांतूनच प्राथमिक शिक्षण दिले जाते. सरकारने स्वतः तयार केलेले धोरण स्वत:च बदलण्याचा प्रयत्न करून लोकांचा रोष ओढवून घेऊ नये असे सांगून प्रा. कामत यांनी प्राथमिक शिक्षण प्रादेशिक भाषांतूनच दिले जावे असे स्पष्टपणे सांगितले.
Sunday, 27 March 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment