Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday, 31 March 2011

माध्यम बदलावर आज राज्य विधानसभेत चर्चा?

पणजी, दि. ३० (प्रतिनिधी)
राज्यातील प्राथमिक शिक्षणाचे माध्यम इंग्रजी करण्यासंबंधीच्या प्रस्तावावर उद्या ३१ रोजी विधानसभेत शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात भाष्य करण्याची शक्यता आहे. विधानसभेत उद्या शिक्षण खात्याच्या आर्थिक मागण्यांवर चर्चा होणार आहे. शिक्षणमंत्र्यांनी माध्यम बदल प्रश्‍नावर सरकार आपला धोरणात्मक निर्णय जाहीर करणार असल्याचे यापूर्वीच घोषित केले आहे. त्यामुळे ही घोषणा कदाचित उद्याच होण्याची शक्यता आहे.
राज्य विधानसभेतील कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ख्रिस्ती आमदार, मंत्र्यांनी प्राथमिक शिक्षणाचे माध्यम इंग्रजी करण्यासाठी जोरदार लॉबिंग चालवले आहे. अधिवेशन काळात पणजीत जाहीर सभेचे आयोजन करून अप्रत्यक्ष सरकारवर दबाव टाकण्याचाही प्रयत्न झाल्याने भाषाप्रेमी बरेच खवळले आहेत. डायसोसेशन सोसायटीच्या पडद्याआडून ही मागणी पुढे केली जात असल्याचे लक्षात येताच सर्व भाषाप्रेमी एकत्र आले व त्यांनीही हा डाव हाणून पाडण्यासाठी जय्यत तयारी चालवली आहे. भारतीय भाषा सुरक्षा मंचच्या झेंड्याखाली कोकणी व मराठीप्रेमी एकत्र आले आहेत. त्यांनी ६ एप्रिल रोजी पणजीत विराट जाहीर सभेचे आयोजन केले आहे.
दरम्यान, या मागणीवरून खुद्द सरकारमध्येच मतभेद निर्माण झाले आहेत. हा धोरणात्मक निर्णय ठरणार असल्याने जनतेला विश्‍वासात घेऊनच त्याबाबत पुढे जाणे योग्य असल्याचे मत मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी कॉंग्रेस विधिमंडळ गटात मांडले आहे. याबाबत राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता ओळखून खुद्द श्रेष्ठींनीही शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांच्याशी संपर्क साधून त्यांना सावध भूमिका घेण्याचा सल्ला दिल्याची चर्चा सुरू आहे. इंग्रजीची मागणी करणारे नेते उद्या सभागृहात नेमकी कोणती भूमिका घेतात हे पाहण्याबरोबरच या विषयावर शिक्षणमंत्री कोणते वक्तव्य करतात, याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे.

No comments: