भारतीय भाषा सुरक्षा मंचातर्फे मडगावात घणाघाती आरोप
मडगाव, दि. ३१ (प्रतिनिधी): प्राथमिक शिक्षणाचे माध्यम इंग्रजी करावे या मागणीमागे चर्चसंस्थेचे कटकारस्थान आहे. त्यांना गोव्याविषयी अजिबात प्रेम नाही तर गोव्यातील देशी भाषा व भारतीय संस्कृती नष्ट करून परत पोर्तुगाल वा इंग्लंडमध्ये जाण्याचे ते वेध आहेत, असा घणाघाती आरोप भारतीय भाषा सुरक्षा मंचातर्फे आज येथे आयोजित सभेत करण्यात आला. ही देशविघातक वृत्ती ठेचून नामशेष करण्याची गरज प्रतिपादतानाच माध्यम प्रश्नी यापूर्वी केलेल्या कायद्याची प्रामाणिक अंमलबजावणी सरकारने करावी, या प्रश्नावर कोणत्याही धर्मसंस्थेची वा राजकारण्यांची लुडबुड खपवून घेतली जाणार नाही, असा कडक इशाराही देण्यात आला.
पाजीफोंड येथील लिंगायत सभागृहात माजी आमदार तथा साहित्यिक ऍड. उदय भेंब्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या सभेत शिक्षणतज्ज्ञ प्रा. भिकू पै आंगले, ग्रेस चर्चचे फादर, प्रशांत नाईक, प्रा. हरिश्चंद्र नागवेकर, अरविंद भाटीकर, विनया शिंक्रे, राशोल सेमिनारीचे फादर मॉसिम आताईद, किरण नाईक व स्वतः ऍड. भेंब्रे यांनी इंग्रजी माध्यमाची मागणी करणार्यांवर कठोर टीका केली व ते भारतीय भाषा व संस्कृतीचे विरोधक असल्याचा आरोप केला.
उदय भेंब्रे यांनी इंग्रजी माध्यमांचा पुरस्कार करणार्या काही मंत्र्यांची नावे घेऊन त्यांचे प्राथमिक शिक्षण इंग्रजीतून झालेले असताना ते शालेय शिक्षणही पूर्ण कां करू शकले नाहीत, असा सवाल केला. इंग्रजी ही पोटाची भाषा आहे असे सांगणार्या तोमाझिन कार्दोज यांची खिल्ली उडविताना त्यांच्या तियात्रांची भाषा कोणती असा सवाल केला. त्यांनी माध्यमाचा हा मुद्दा चर्चने चिघळविल्याचा व राजकारण्यांनी त्यांच्याशी संगनमत केल्याचा आरोप केला. भाषा व संस्कृती यांचा परस्पर संबंध असतो व म्हणून ज्यावेळी भाषा मरते तेव्हा आपोआपच संस्कृतीही नामशेष होते हे या लोकांनी लक्षात ठेवावे असेही सांगण्यात आले.
अरविंद भाटीकर यांनी आजच्या परिस्थितीवर विवेचन केले व शाळेत जाणारी मुले साध्या फळांची देखील ओळख विसरत चाललेली आहेत याकडे लक्ष वेधून महिलावर्गाने यावर गांभीर्याने विचार केला पाहिजे असे सांगितले. शिक्षणाचे माध्यम हा राजकारणाचा वा धर्माचा मुद्दा नाही तर ते तज्ज्ञांचे क्षेत्र आहे, असे सांगून लोकांची दिशाभूल करून त्यांना रस्त्यावर आणणार्या चर्च संस्थेला त्यांनी इशारा दिला व त्यांच्याप्रमाणे उद्या अन्य धर्माचे प्रमुख रस्त्यावर आले तर काय होईल त्याचा विचार करा असे सांगितले. आता पालकांचा सल्ला कशाला घेता व तो घेणार असाल तर माध्यम प्रश्नावर सरळ जनमत घ्या असे आव्हानच त्यांनी यावेळी दिले.
भिकू पै आंगले यांनी कोकणी व मराठी शाळा बंद करून सर्व शाळा डायसोसनखाली आणण्याचा हा कट असल्याचे सांगून सर्वांनी सावध व संघटित राहण्याची गरज प्रतिपादिली.
हरिश्चंद्र नागवेकर यांनी हा विषय गोव्याच्या भवितव्याचा असल्याचे सांगितले तर ग्रेस चर्चचे फादर यांनी स्थानिक भाषांमुळे दृष्टी विशाल बनत असल्याचे सांगितले. प्रशांत नाईक यांनी अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्यांचा हा उपद्व्याप असल्याचे म्हटले. फादर मॉसिम आताईद यांनी भारतीय भाषांच्या शाळांनाच अनुदान, नव्या इंग्रजी शाळांना परवानगी नाही व स्थानिक भाषांतून प्राथमिक शिक्षण अशी शपथ घेण्याचे आवाहन केले.
सर्वांनी बुधवारच्या पणजीतील सभेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले व त्यासाठी भिकू पै आंगले व प्रशांत नाईक यांची समिती निवडली गेली. सूत्रसंचालन नागेश हेगडे यांनी केले.
Friday, 1 April 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment