Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 30 March 2011

खारीवाड्यातील ८७ घरांवर आज ‘बुलडोझर’ फिरणार...

वास्को, दि. २९(प्रतिनिधी): मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठानेे काल दि. २८ रोजी मुरगाव नगरपालिकेला खारीवाडा येथील ‘त्या’ ८७ घरांवर का कारवाई केली नाही असा प्रश्‍न केल्यानंतर पालिकेने कारवाईसाठी कंबर कसली असून सदर घरांवर उद्या बुधवारी ‘बुलडोझर’ फिरवण्याचे निश्‍चित केले आहे. येणार्‍या चार दिवसांच्या आत खारीवाडा येथील या घरांवर कारवाई करून त्याबाबतचा अहवाल ६ एप्रिल रोजी न्यायालयाला सादर करण्यात येणार असल्याची माहिती मुरगावचे मुख्याधिकारी गोपाळ पार्सेकर यांनी आज संध्याकाळी पत्रकारांना दिली.
२००९ साली ‘एमपीटी’ने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठासमोर बंदराच्या विस्तारीकरणासाठी व अन्य कारणांसाठी खारीवाडा येथील जागा खाली करून देण्याबाबत याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाने पालिकेला काही दिवसांपूर्वी याबाबत आदेश दिले होते. खारीवाडा येथील ३६३ घरांवर फेब्रुवारी महिन्यात ‘बुलडोझर’ फिरवला जाणार असल्याची माहिती येथील घरमालकांना मिळताच त्यांपैकी २७६ घरमालकांनी प्रशासकीय लवादासमोर धाव घेऊन घरे जमीनदोस्त करण्याच्या आदेशावर स्थगिती मिळवण्यास यश मिळवले होते. दरम्यान, काल झालेल्या सुनावणीवेळी, ज्या घरांनी स्थगिती मिळवलेली नाही त्यांच्यावर अजून का कारवाई करण्यात आलेली नाही असा प्रश्‍न न्यायालयाने उपस्थित केला होता व ६ एप्रिलपर्यंत सदर घरांवर कारवाई करून संपूर्ण अहवाल सादर करण्याचा आदेश दिला होता. या आदेशामुळे आज मुरगाव नगरपालिकेच्या कामांना वेग आला असल्याचे दिसले. या प्रकरणी मुरगावचे मुख्याधिकारी गोपाळ पार्सेकर यांच्याशी संपर्क साधला असता उद्या सकाळी ९.३० वाजल्यापासून खारीवाडा येथील ‘त्या’ ८७ घरांवर कारवाई करण्याचे काम सुरू होईल, असे त्यांनी सांगितले.
सदर घरे जमीनदोस्त करण्यासंदर्भात दक्षिण गोवा पथकाला कळविण्यात आले असून उद्या हे पथक खारीवाड्यावर येणार असल्याचेही श्री. पार्सेकर म्हणाले. आज यासंदर्भात झालेल्या बैठकीला दक्षिण गोवा पथकाचे उपजिल्हाधिकारी जॉन्सन फर्नांडिस, मुरगावचे उपजिल्हाधिकारी लेविन्सन मार्टीन्स, मुख्याधिकारी गोपाळ पार्सेकर, पोलिस उपअधीक्षक महेश गावकर व इतर अधिकारी उपस्थित होते.उपजिल्हाधिकारी जॉन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई केली जाईल व यावेळी अन्य अधिकारीही उपस्थित असतील असे सांगण्यात आले. दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक ऍलन डीसा यांनी यावेळी ‘आयआरबी’ सुरक्षेसाठी पत्र लिहिण्यात आले असल्याची माहिती दिली. उद्या सकाळी कडक बंदोबस्तात या घरांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत डीसा यांनी दिले.
दरम्यान, उद्या घरांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पसरताच येथे संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रत्यक्ष कारवाईवेळी अनुचित प्रकार घडण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.

No comments: