पणजी, दि. ३० (प्रतिनिधी)
लहान मुलाचे मन नाजूक, कोमल असते. त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रादेशिक भाषेतूनच प्राथमिक शिक्षण देण्याची गरज आहे. त्यांच्यावर इंग्रजी माध्यम लादण्याचा भयानक प्रयोग गोवा सरकारने करू नये, असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखिका माधवीताई देसाई यांनी केले.
गोव्यातील काही इंग्रजीप्रेमींनी राजकारण्यांना हाताशी धरून गोव्यातील प्राथमिक शिक्षणाचे माध्यम इंग्रजी करण्याची जी मागणी केली आहे, त्यावर एक कट्टर मराठी भाषाभिमानी असलेल्या ज्येष्ठ लेखिका माधवीताई देसाई बोलत होत्या. इंग्रजी माध्यमाची मागणी करणारे राजकारणी आपला स्वार्थ साधण्यासाठी इंग्रजी माध्यमाची मागणी करीत आहेत. सरकारने शिक्षणाच्या बाबतीत राजकारण करू नये. कारण शिक्षणातील नियोजनशून्य निर्णयांचे भयानक परिणाम पुढे दिसू शकतात. आपण एक सेवानिवृत्त शिक्षिका आहे. त्यामुळे मुलांच्या मानसिकतेचा आपण जवळून अभ्यास केलेला आहे. ज्या भाषा देशी आहेत, परिसरात बोलल्या जातात, पालकांना ज्या भाषांचे ज्ञान आहे अशाच भाषा मुलांना प्राथमिक शिक्षणासाठी योग्य आहेत. याच भाषांतून प्राथमिक शिक्षण देणे गरजेचे आहे असे ठाम प्रतिपादन श्रीमती देसाई यांनी केले.
पालकांनी मानसिकता बदलावी
इंग्रजी शिकल्यानंतरच आपल्या मुलाला नोकरी मिळेल, शेजारी आपल्या मुलाला दूरच्या इंग्रजी शाळेत पाठवतो म्हणून आपणही पाठवावे अशी अनेक पालकांची मानसिकता झाली आहे. सध्या हे ‘फॅड’च आले आहे. मात्र, या गोष्टी अर्धसत्य आहेत. आपल्या मुलांनी तर मराठी माध्यमातून प्राथमिक शिक्षण घेऊन देशविदेशांत नावलौकिक मिळवला आहे. गोव्यातील मोठमोठ्या नामांकित व्यक्तीसुद्धा प्रादेशिक भाषेतून शिकून कीर्तिमान झाल्या आहेत. त्रासदायक ठरणार्या इंग्रजी शाळांत मुलांना पाठवून पालकांनी त्यांचे बालपण हिरावून घेऊ नये असे माधवीताई म्हणाल्या. मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण घेतलेली मुले संस्कारमय व हुशार होतात. त्यांना परिसरातील परिस्थितीचे चांगल्या पद्धतीने आकलन होते. हे सत्य असून आपण ते पालकांना पटवून देण्यासाठी जनजागृती करणार आहे, अशी माहिती माधवीताईंनी यावेळी दिली.
Thursday, 31 March 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment