• अकादमीत रंगभूमीदिन साजरा
• नाट्यकलाकारांचा सन्मान
पणजी, दि. २७ (सांस्कृतिक प्रतिनिधी)
आज पृथ्वीची अवस्था आयसीयूमध्ये असलेल्या रुग्णापेक्षाही अत्यंत वाईट होत चालली आहे. तिची काळजी घेणे ही कलाकारांची जबाबदारी आहे. कलाकारांनी नाटकाच्या वा चित्रपटाच्या माध्यमातून निसर्गसर्ंवधनाविषयी जनजागृती करावीच परंतु आपण एखादा चित्रपट वा नाटक करत असताना निसर्गाची कमीत कमी हानी कशी होईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे असे चित्रपट दिग्दर्शक परेश मोकाशी यांनी सांगितले. कला अकादमीने आयोजित केलेल्या जागतिक रंगभूमीदिन सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत कला अकादमीचे उपाध्यक्ष परेश जोशी, सदस्य सचिव डॉ. पांडुरंग फळदेसाई, सत्कारमूर्ती विनायक खेडेकर, रवींद्र आमोणकर, सुभाष केंकरे आणि भरत नायक व्यासपीठावर उपस्थित होते.
श्री. मोकाशी पुढे म्हणाले की, आमच्यासारख्या कलाकारांचे वाजवीपेक्षा जास्त कौतुक होते. वास्तविक जे लोक समाजाच्या हितासाठी रात्रंदिवस झटत असतात त्यांच्या मानाने आमचे कार्य खूपच कमी आहे. गोवा हे पर्यटन स्थळ आणि इतर कारणांसाठी प्रसिद्ध असले तरी आपल्याला नाटकाच्या निमित्ताने गोव्यात येणे फार आवडते, असेही शेवटी श्री. मोकाशी यांनी सांगितले.
यावेळी विनायक खेडेकर (नाट्यलेखन), रवींद्र आमोणकर (दिग्दर्शन), भरत नायक (अभिनय-नाट्यलेखन), सुभाष केंकरे (प्रकाशयोजना) यांचा श्री. मोकाशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलेल्या ‘बाई मी दगुड फोडिते’ या नाटकाच्या भार्गवी आर्टस् पर्वरी कलाकारांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. कला अकादमीने आयोजित केलेल्या विविध नाट्यस्पर्धांतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. यावेळी सत्कारमूर्तींच्या वतीने विनायक खेडेकर आणि भरत नाईक यांनी मनोगत व्यक्त केले. परेश जोशी यांनी मान्यवरांचे स्वागत केले तर सूत्रसंचालन स्मिता संझगिरी यांनी केले. डॉ. अजय वैद्य यांच्या कल्पनेने साकार झालेला आणि सुमेधा देसाई यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘कोणे एके काळी’ या कार्यक्रमाने सांगता करण्यात आली.
Monday, 28 March 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment